यंत्रणांनी अलर्ट मोडवर काम करावे - ना. मेघना बोर्डीकर

अलिबाग: राज्य आणि केंद्र शासनामार्फत विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या सर्व योजनांचा तत्परतेने लाभ देण्यासाठी तसेच जनतेचे प्रश्न गांभीर्याने सोडविण्यासाठी सर्व यंत्रणानी अलर्ट मोडवर काम करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य-कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा-स्वच्छता, ऊर्जा, महिला-बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.

अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत ना. बोर्डीकर यांनी २७ जून रोजी सार्वजनिक आरोग्य-कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा-स्वच्छता विभाग, ऊर्जा, महिला-बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम  विभागांचा सविस्तर आढावा घेतला. सदर बैठकीस खासदार धैर्यशील पाटील, ‘जिल्हा परिषद'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके, माजी आमदार पंडीत पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत रायगड जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी तसेच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सुरु असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा योजनेची प्रगती आणि उर्वरित गावांमध्ये जलवाहिन्या पोहोचवण्याच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्याच्या पाणी प्रश्न, जलजीवन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदि विषयांवर मंत्रालयात विशेष आढावा बैठक घेण्यात येईल, असे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी जाहीर केले.

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदभरती प्रक्रिया तातडीने करावी. आरोग्याच्या सुविधा आणि योजना १०० टक्के राबविल्या जातील याकडेही लक्ष द्यावे, असेही ना. बोर्डीकर यांनी सांगितले. वीज वितरण विषयक तक्रारींचे तात्काळ निराकरण करावे. अखंडीत वीजपुरवठा सुरु ठेवण्यासाठी सर्वांनी नेहमी दक्ष रहावे. भूमीगत वायरींगचे काम पूर्ण झाले असल्यास ओव्हरहेड वायरींग हटविण्यात यावेत. अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर वारंवार बदलावे लागतात, त्याची कारणमिमांसा करुन उपाययोजना करावी. सेवा सप्ताह अंतर्गत जी धोकादायक क्षेत्र निश्चित केली आहेत, त्या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना ना. मेघना बोर्डीकर यांनी यावेळी दिल्या.

प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याने जनतेच्या प्रश्नांची गांभीर्याने आणि तत्परतेने दखल घेऊन ते प्रश्न मार्गी लावावेत, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी  सविस्तर माहिती दिली.  जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासन दक्ष असून विविध योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी सांगितले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

ना. गणेश नाईक यांचा सलग 11 तास  जनता दरबार; 450 पेक्षा अधिक निवेदने प्राप्त