वाशी येथे ‘घरेलू कामगार संसद' संपन्न
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय घरकामगार दिन निमित्त वाशी येथे ‘घरेलू कामगार संसद'चे भव्य आयोजन करण्यात आले. युवा संस्था आणि महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात देशभरातील सुमारे ८०० घरेलू कामगार महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या ‘संसद'मधून घरकामगार महिलांनी आपल्या अस्तित्वाचा ठसा उमठवत न्याय, सुरक्षा आणि हक्कांसाठीचा आवाज बुलंद केला.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ विधिज्ञ आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या हस्ते झाले. आपल्या भाषणात त्यांनी मी देखील कधी काळी मजूर म्हणून काम केले असून, तुम्ही सगळ्या माझ्या आईसारख्या आहात, असे भावनिक उद्गार काढले. तसेच घरकामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी तातडीने सर्वंकष कायद्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कॉ. उदय भट यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही केंद्र सरकारकडून कोणतीही कृती न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ कायदा, २००८ च्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी केली. यावेळी ॲड. गायत्री सिंह, नीला लिमये, पत्रकार रैना असैनार यांनी कामगार महिलांना मोलकरीण न मानता कामगार म्हणून मान्यता आणि संपूर्ण हक्क मिळाले पाहिजेत, असे आवर्जुन सांगितले.
या कार्यक्रमात आपला खासदार प्रतिबध्द खासदार या मोहिमेचा समारोप झाला. तसेच मेरी कहानी, मेरी जुबानी या सत्रात ६ महिलांनी आपल्या आयुष्यातील खडतर अनुभव सर्वांसमोर मांडले. चोरीचे खोटे आरोप, पेन्शनसाठीची आवश्यकता, मुलांच्या शिक्षणाच्या अडचणी, असुरक्षित कार्यस्थळ अशा समस्यांमुळे त्यांना कायद्याच्या संरक्षणाची गरज असल्याचे त्यांच्या बोलण्यावरुन अधोरेखित झाले.
यावेळी घर कामगारांच्या वास्तवाचे प्रतिबिंब असलेल्या जनजागृती रील्सचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जनजागृती गाणी आणि ‘संविधान'च्या प्रस्ताविकाचे सामुहिक वाचन झाले. रोशनी नुगेहल्ली यांनी प्रास्ताविक केले. तर मिनार पिंपळे यांनी अध्यक्षस्थान भूषवले. विजय खरात यांनी सूत्रसंचालन तर सुजित निकाळजे यांनी आभार प्रदर्शन केले.