निधी अभावी १४ गावांचा खुंटला विकास जाहीर केलेला ६५०० कोटींचा निधी कधी देणार?

वाशी : कल्याण तालुक्यातील १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर  निर्णय घेताना येथील विकासकामांसाठी ६५०० कोटी शासनाने देण्याचे जाहीर केले होते. मात्र, सदर निधीतील एकाही टप्प्याची रक्कम अद्याप देण्यात आली नसल्याने १४ गावांचा विकास खुंटला आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेला निधी कधी उपलब्ध होणार? असा सवाल माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी केला आहे.

१४ गावातील ग्रामस्थ आणि माजी आमदार राजू पाटील यांच्या पाठपुराव्याने २०२२ साली १४ गावे पुन्हा नवी मुंबई महापालिका मध्ये समाविष्ट करण्यात आली. त्यावेळी सदर १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करतानाच या गावांच्या मूलभूत सोयी-सुविधांसाठी आवश्यक असलेला साधारण ६,५०० कोटी रुपयांचा निधी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी टप्प्याटप्प्याने देण्याचे कबूल केले होते. परंतु, अजुनपर्यंत सदरचा निधी वर्ग केला नाही. नेमका हाच मुद्दा पुढे करुन वनमंत्री गणेश नाईक यांनी १४ गावांना ६५०० कोटी निधी दिल्याशिवाय सदर गावे नवी मुंबईमध्ये घेण्यास विरोध केला आहे.

ना. गणेश नाईक यांनी घेतलेली भूमिका रास्तच आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या या गावांच्या विकासासाठी लागणारा निधी राज्य सरकारने द्यायचा आहे. जेणेकरुन नवी मुंबईकरांवर पैशांचा अतिरिक्त भार पडणार नाही. तर आपल्या पुत्राच्या लोकसभा आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी याच मुद्यावर मते मागणारे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या विषयावर गप्प का आहेत? १४ गावांसाठी घोषणा केलेले ६५०० कोटी काही एकाच टप्प्यात खर्च करायचे नाहीत तर त्याचे टप्प्याटप्प्याने ५-६ वर्षाचे नियोजन करुन खर्च करायचे आहेत. मग, तो निधी मंजूर करण्यासाठी कसली अडचण येत आहे? असा सवाल माजी आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

सदर सर्व गावे आगरी बहुल आहेत, म्हणून त्यामुळे आगरी समाजाला गृहीतच धरत आहात का? १४ गावांनी याच कामासाठी आपल्या पक्षाला आणि पुत्राला लोकसभा आणि विधानसभेत आपल्या उमेदवाराला भरपूर मतदान केले. त्याचा हाच परतावा तुम्ही देत आहात का? १४ गावांसाठी जाहीर केलेला निधी नवी मुंबई महापालिकेला वर्ग करावा. जेणेकरुन येथील विकासाला चालना मिळू शकेल.
- राजू पाटील, माजी आमदार तथा मनसे नेते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मराठी माणसाच्या रेट्यापुढे आमदाराने पोलिसांच्या साक्षीने हटवली गुजराती पाटी