‘शिवकालीन शस्त्र प्रदर्शन'ला नागरिकांचा प्रतिसाद

अंबरनाथ : शिवसेना आणि संस्कृती कानसई प्रतिष्ठानच्या वतीने माजी नगरसेवक कुणाल भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीचे औचित्य साधून अंबरनाथ (पूर्व) येथील कानसई परिसरात ‘शिवकालीन शस्त्र प्रदर्शन'चा पारंपरिक आणि अभिमानास्पद उपक्रम पार पडला.

शौर्य आणि संस्कृतीचा संगम असलेल्या या कार्यक्रमाचे उद्‌घाटन इंडियन आर्मीचे सुभेदार महेंद्र गवई आणि सलील झवेरी यांच्या शुभहस्ते झाले. या प्रदर्शनाला परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. या प्रदर्शनात शिवकालीन काळातील विविध शस्त्रांचे दर्शन घडविण्यात आले. तलवारी, भाले, कवच, ढाली अशा अनेक ऐतिहासिक शस्त्रांनी उपस्थितांना थेट त्या शौर्ययुगाचा प्रवास घडविला. प्रत्येक शस्त्र शिवकालीन पराक्रमाची, शौर्याची आणि बलिदानाची आठवण करुन देणारे होते. शस्त्रे केवळ अवजार नसून, आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा जिवंत ठेवा आहेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

येथील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या शस्त्र प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी शस्त्रांची माहिती जाणून घेतली, त्यांच्या निर्मितीतील बारकावे समजून घेतले आणि आपल्या कुटुंबासह छायाचित्रे घे ऊन त्या ऐतिहासिक क्षणांची आठवण मनात साठवली. दीपावलीसारख्या सणाच्या शुभप्रसंगी अशा अर्थपूर्ण उपक्रमाचे आयोजन करुन ‘संस्कृती कानसई प्रतिष्ठान'ने नक्कीच सुंदर उदाहरण निर्माण केले आहे.

शिवकालीन शस्त्र म्हणजे आपला अभिमान, आपल्या इतिहासाची शान आणि शौर्याची बोलकी गाथा आहे. अशा उपक्रमांमुळे आपल्या नव्या पिढीला प्रेरणा मिळेल आणि आपली ओळख अधिक दृढ होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

सदर कार्यक्रमाला ‘साई कानसई जेष्ठ नागरिक संघ'चे अध्यक्ष मोहन पैठणकर, डॉ. सतीश जगताप, विजय इंगळे, फोरेबी यादव, प्रशांत भोईर, जपेश भोईर, युवा सेनेचे प्रीतीश इंगळे, तन्मय भोईर, देव यादव, आदिंसह विभागातील अन्य मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली