७७ वर्षांनंतरही स्मशानभूमीकडे जायला रस्ता अनुपलब्ध
कल्याण : कल्याण तालुक्यातील म्हसकळ गाव आजही मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. या गावात मृतदेह नेण्यासाठी सुध्दा रस्ता उपलब्ध नसल्याचे विदारक वास्तव समोर आले. एका वृध्दाच्या अंत्यविधीसाठी गावकऱ्यांना चिखल, गोटे आणि माती तुडवत मृतदेह स्मशानभूमीकडे नेण्याची वेळ आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर गावाची सदर वाईट अवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली.
पूर्वी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी गावदांड रस्त्याचा वापर होत असे. पण, सदर मार्गावर खाजगी मालकीच्या जमिनीवर वॉल कंपाऊंड उभारण्यात आल्याने तो मार्ग बंद झाला आहे. याच रस्त्यावरुन जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईनही टाकण्यात आली होती. मात्र, आता त्या मार्गाचा वापर करता येत नसल्याने गावकऱ्यांना तात्पुरत्या, कच्च्या आणि धोकादायक मार्गाने मृतदेह नेण्याची वेळ येते. पावसाळ्यात सदर रस्ता चिखलात बुडतो आणि त्यावरुन वृध्द, महिला आणि लहान मुलांना चालणेही अशक्य होते. त्यामुळे केवळ अडथळेच नव्हे, तर मयतांच्या सन्मानाला धक्का पोहोचतो, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
या प्रश्नाबाबत गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असून, अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले गेले, तरीही प्रत्यक्षात काहीही झालेले नाही. जिथे मृत व्यक्तीलाही सन्मानाने शेवटचा निरोप देता येत नाही, तिथे विकास कशाला हवा? असा संतप्त सवाल गावकरी विचारत आहेत. गावात यामुळे असंतोष वाढला असून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये ग्रामस्थ मतपेटीतून आपला संताप व्यक्त करतील, ते स्पष्ट दिसत आहे. तसेच ग्रामस्थांनी आता १५ ऑगस्टला ग्रामसभा घेऊन ठिय्या आंदोलन किंवा उपोषणाची तयारी सुरु केली आहे.
याबाबत तहसीलदार सचिन शेजळ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सदर प्रश्न ग्रामपंचायत मार्फत बीडीओ स्तराशी निगडित असून शेतीत जाण्यासंदर्भात विषय असता तर तो सुनावणी घेत मार्गी लावता येतो, असे सांगितले. कल्याण पंचायत समिती बीडीओ संजय भोये यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.