नवी मुंबईतून विमानोड्डाणाचा मुहूर्त.. १७ सप्टेंबरचा ?

देशांतर्गत व परदेशांतर्गत विमानसेवा एकाच वेळेस सुरू करण्याचा मानस

नवी मुंबई : नवी मुंबईतून विमानोड्डाणाचा मुहूर्त येत्या सप्टेंबर महिन्यातला काढला जाणार असल्याचे विमानतळ उभारणाऱया अदानी समूहाकडून राज्याच्या सार्वजनिक उपक्रम समितीला सांगण्यात आले. त्यामुळे येत्या १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवी मुंबईतून विमानोड्डाणाला सुरुवात करण्याचा मानस राज्य सरकार व अदानी समूहाचा दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.  

येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतून विमानोड्डाण करण्याचे सिडको व राज्य सरकारचे स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळाले आहे. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या कामाच्या आढावा बैठकीसाठी बुधवारी विमानतळ साईटवर आलेल्या राज्यातील आमदारांच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या (पीयूसी) शिष्टमंडळासमोर प्रकल्पाचे सादरीकरण करताना नवी मुंबईतून विमानोड्डाणाचा मुहूर्त आता येत्या सप्टेंबर महिन्यातला ठरवला जाणार आहे.  

दरम्यान, नवी मुंबईतून विमानोड्डाणाच्या मुहूर्ताची गत सहा महिन्यांपासून तारीख पे तारीख पडत राहिल्याने विमानतळ उभारणीत पुन्हा काही अडचणी निर्माण झाल्या आहेत का? असा प्रश्न नवी मुंबईकर जनतेला पडला आहे. नवी मुंबई विमानतळ टर्मिनल-१ चे काम वॉर फुटींवर सुरू असून ते १५ सप्टेंबरच्या सुमारास पूर्णत्वास जाणार असल्याचे बोलले जाते. तब्बल १३ हजार कामगार विमानतळ प्रकल्पस्थळी काम करत आहेत.  त्यामुळे फक्त देशांतर्गत (डोमेस्टिक) विमान उडवण्याऐवजी परदेशांतर्गत (इंटरनॅशनल) विमानसेवा देखील एकाच वेळेस सुरू करण्याचा मानस अदानी सुमूह व केंद्र सरकारच्या स्तरावर घेतला गेल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वी  मे २०२५ व जून २०२५ मध्ये नवी मुंबईतून विमानोड्डाण करण्याचा मुहूर्त काढण्यात आला होता. परंतु, विमानतळ टर्मिनलचे काम पूर्ण न झाल्याने १५ ऑगस्टचा मुहूर्त काढण्यात आला होता. मात्र टर्मिनलचे काम पुर्णत्वास जाण्यासाठी किमान १५ सप्टेंबर उजाडणार असल्याचे अदानी समूहातर्फे सार्वजनिक उपक्रम समितीच्या आढावा बैठकीत सांगण्यात आले. या समितीने रनवे व टर्मिनल कामाची पाहणी करुन विमानतळ प्रकल्पाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत विमानतळ सुरु होण्यासाठी सप्टेंबर २०२५ उजाडणार असल्याचे स्पष्ट केले. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असल्याने विमानतळ उद्घाटनाचा मुहूर्त या तारखेच्या आसपास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

विमानतळ टर्मिनलचे काम नाजूक व खडतर
कमळाच्या पाकळ्या च्या आकाराचे स्वरूप नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलचे आहे. अत्यंत आकर्षक दिसणारे हे टर्मिनल जागतिक स्तरावर सर्वोत्तम ठरले जाणार आहे. त्यामुळे कमळाच्या पाकळ्या रुपी टर्मिनलचे काम तितकेच खडतर देखील आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वास्तू रचनाकार व अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ञ नवी मुंबई विमानतळ सुरू करण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत.

नवी मुंबई विमानतळ प्रकल्प हा नवी मुंबई आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी वाहतूक आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे. सदर विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि व्यापार वाढीच्या नव्या संधी महाराष्ट्रासाठी व या देशासाठी निर्माण होणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडको निर्मित इमारती धोकादायक