माजी महापौरांचे नाव २ विधानसभा मतदारसंघात
भाईंदर : मिरा-भाईंदरच्या माजी महापौर तथा आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता यांचे नाव मिरा-भाईंदर आणि ओवळा माजीवडा अशा दोन विधानसभा मतदारसंघात असल्याने ‘भाजपा'ने व्होट चोरी केल्याचा आरोप माजी आमदार मुजपफर हुसेन यांनी पत्रकार परिषद द्वारे केला आहे.
माजी आमदार मुजपफर हुसेन यांनी सांगितले की, ‘भाजपा'च्या माजी महापौर डिंपल मेहता, माजी नगरसेवक संजय थेराडे, त्यांची पत्नी वनिता थेराडे, माजी नगरसेविका कुसुम संतोष गुप्ता त्यांचे पती संतोष गुप्ता, रविकांत उपाध्याय, त्यांची पत्नी शीतल उपाध्याय यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे ‘भाजपा'ने ‘विडणूक आयोग'ला हाताशी धरुन नोंद करत व्होट चोरी केली आहे. दोन्ही मतदारसंघात नावे नोंदवून संबंधितांनी लोकप्रतिनिधीत्व कायद्याचा भंग केला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी यावेळी मुझपफर हुसेन यांनी केली.
दरम्यान, माजी आमदार हुसेन यांच्या पत्रकार परिषदनंतर काही वेळातच भाजपा आमदार आणि मेहता यांनी सुध्दा पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडन करीत ‘काँग्रेस'च्या माजी नगरसेविका गीता परदेशी, ‘काँग्रेस'चे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांची नावे दोन ठिकाणी तर सामंत यांच्या पत्नीची नावे तीन ठिकाणी असल्याचे सांगितले.