सिडको निर्मित इमारती धोकादायक

वाशी : नवी मुंबई शहरातील सिडको निर्मित इमारती जीर्ण होऊन धोकादायक बनल्या असून, पावसाळ्यात या इमारतींतील घरामधील छताचे प्लास्टर पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. नेरुळ सीवूड्‌स सेक्टर-४८ मधील कांबळे यांच्या घरात २६ जून रोजी रात्री छताचे प्लास्टर पाडण्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणी जखमी झाले नसले तरी धोकादायक झालेल्या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.

मुंबई मधील वाढत्या लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाने मुंबई लगत नवीन शहर वसविण्याची जबाबदारी सिडको महामंडळकडे दिली. ‘सिडको'ने देखील नवी मुबई शहर वसविताना सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या घरांची निर्मिती केली. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे बांधताना त्यांचा दर्जा न राखल्याने अवघ्या २५ते ३० वर्षातच परवडणारी घरे जीर्ण होऊन त्यांची परझड होण्यास सुरुवात झाली. दरवर्षी पावसाळी दिवसांमध्ये सिडको निर्मित घरातील छत पडण्याच्या घटनांत वाढ होऊन आतापर्यत बरेच नागरिक जखमी झाले आहेत. आता पावसाळा सुरु झाल्यानंतर पुन्हा एकदा सिडको निर्मित घराच्या छताचे तुकडे पडण्यास सुरुवात झाली आहे. सीवूड्‌स भागात नुकतेच घरांच्या छतांचे प्लास्टर खाली पडले.या घटनेत सुदैवाने कुणी जखमी झाले नाही. मात्र, नुकतीच नेरुळ मधील विश्वशांती सोसायटीतील घराच्या छताचे प्लास्टर पडून एक वृध्द महिला जखमी झाल्याची घटना घडली होती. सदर घटना ताजी असताना सीवूड्‌स विभागात २६ जून रात्री अष्टगंधा सोसायटी मधील डी-३२ विंग मधील रुम नंबर-८ मधील किचन मधील छताचे प्लास्टर कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणी जखमी झाले नाही. मात्र, सदर घटनेमुळे सीवूड्‌स विभागातील सेक्टर-४८,४८ ए आणि ४६ मधील नागरिकांना आपली रात्र भीतीच्या सावटाखाली काढावी लागत आहे. त्यामुळे सिडको प्रशासनाने धोकादायक इमारतींची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) विभाग प्रमुख विशाल विचारे यांनी केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बंगलापाडा आदिवासी पाड्यातील नागरिकांचा जीवघेणा प्रवास