सिडको घरांच्या किंमती कमी करण्याची मागणी
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मुखवटे घालून प्रदर्शनाचे उद्घाटन
नवी मुंबई : ऑक्टोबर २०२४ मध्ये सर्वसामान्यांना परवडणारी घरे देणार म्हणून ‘सिडको'ने २६,००० घरांची सोडत जाहीर केली. तत्कालीन सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सुध्दा सदर घरे स्वस्तात असतील, अशी घोषणा केली होती. पण, प्रत्यक्षात राज्याची निवडणूक झाल्यानंतर ‘सिडको'ने या घराच्या किंमती जाहीर केल्या. तेव्हा सिडको घरांच्या किंमती खूप जास्त (महाग) असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे याचा निषेध म्हणून सिडको सोडत धारकांनी मनसे प्रवक्ते तथा शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली सिडको विरुध्द लढा उभारला.
पत्रकार परिषद, मानवी साखळी आंदोलन, पोस्ट कार्ड मोहीम, इंजेक्शन मोर्चा काढून देखील राज्य सरकार आणि सिडको प्रशासन घरांचे दर कमी करत नाही, असे दिसत असल्याने ‘मनसे'तर्फे १३ एप्रिल रोजी वाशी येथे भव्य चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. ‘सिडको'च्या वाशी, खारघर, कळंबोली, तळोजा, खारकोपर, बामणडोंगरी अशा विविध नोड मधील सोडत धारकांनी आपली सर्जनशीलता वापरुन विविध चित्र स्वरुपाचे पोस्टर्स बनवले होते. साधारण ३० ते ३५ पोस्टर्स बनवून तसेच २-३ थ्री डी मॉडेल बनवून नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. या चित्र प्रदर्शनाला येण्यासाठी सोडत धारकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इतर मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक यांना निमंत्रण दिले होते. परंतु, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सदर प्रदर्शनास न आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुखवटे घालून त्यांच्या हस्ते प्रतिकात्मक पध्दतीने या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने सिडको सोडतधारक, सामान्य नागरिक उपस्थित होते.
म्हाडा आर्थिकदृष्ट्या दुर्बल (एलआयजी) घटकाचे उत्पन्न ६ लाख ते ९ लाख ग्राह्य धरते. तसेच म्हाडा कुर्ला येथे ५० लाखात जवळपास ५०० चौरस फुटाचे घर देते. तर सिडको याच घटकासाठी उत्पन्न मर्यादा ठेवत नसून २९२ चौरस फुटाचे घर जवळपास ७५ लाखाला विकते. ‘सिडको'ने रेडी रेकनर प्रमाणे २९२ चौरस फुटाचे घर २५ लाखाला द्यायला पाहिजे. परंतु, प्रत्यक्षात सदर घरे ५० लाख ते ७५ लाखाला विकते. असा फरक चित्राद्वारे सोडतधारकांनी दाखवून दिला. बामणडोंगरी भागात २९२ चौरस फुट घराची किंमत ३१ लाख असताना जवळच सारखा प्रकल्प असणाऱ्या खारकोपर येथे तेवढेच घर ३९ लाखाला का विकत आहेत? असा सवाल खारकोपर येथील सोडतधारकांनी उपस्थित केला. तळोजा नोड येथील सिडको सोडतधारकांनी कल्पकपणे देखाव्यातून तळोजाला प्रदूषण जास्त असून दळणवळणाच्या सोयींचा अभाव असल्याचे दाखविले. तर काही सोडत धारकांनी ‘सिडको'ने कशा प्रकारे ३० चौरस फुट क्षेत्रफळाची चोरी केली, ते चित्राद्वारे दाखवून दिले. कळंबोली येथे गृहनिर्माण प्रकल्प बस आगारवर उभा केलेला असल्याने त्याचा त्रास नागरिकांना आहे. अशा वेळी किंमती कमी असायला हव्यात अशी भावना कळंबोली नोड मधील सोडत धारकांनी बोलून दाखवली. असे विविध प्रश्न सिडको सोडतधारकांनी अत्यंत कल्पकतेने जनतेसमोर मांडले.
दरम्यान, एवढी आंदोलने केली तरी राज्य सरकार आणि सिडको प्रशासनाला पाझर फुटत नाही, याची खंत गजानन काळे यांनी व्यक्त केली. रेरा कायद्याचे अभ्यासक शहाजी पाटील यांनी उपस्थित सोडतधारकांना मार्गदर्शन करताना ‘सिडको'विरुध्द कशा पध्दतीने कायदेशीर कारवाई होऊ शकते, ते सांगितले. तसेच उद्या १६ एप्रिल रोजी सर्व सिडको सोडतधारकांना घेऊन मुंबईतील रेरा कार्यालयात तक्रार अर्ज नोंदवणार, अशी घोषणा यावेळी गजानन काळे यांनी यावेळी केली.
सदर चित्र प्रदर्शनाला मनसे महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव अभिजीत देसाई, महिला सेना उपशहर अध्यक्ष दिपाली ढवूळ, शहर सचिव यशोदा खेडसकर, विभाग अध्यक्ष अभिलेश दंडवते, सागर विचारे, शाम ढमाले, उमेश गायकवाड, नितीन नाईक, विशाल गाडगे, आनंद चौगुले, संगीता वंजारी, नंदा मोरे, प्रियांका शिरोडकर, रोजगार विभाग शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, रस्ते आस्थापना शहर अध्यक्ष संदीप गलुगडे, चित्रपट सेना शहर अध्यक्ष अनिकेत पाटील, विभाग सचिव अर्जुन चव्हाण, अक्षय कदम, उपविभागअध्यक्ष संजय शिर्के, प्रशांत पाटेकर, शाखा अध्यक्ष पुंडलिक पाटील तसेच मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक, सिडको सोडतधारक, सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.