एपीएमसी फळ बाजारात फळे आवक मध्ये वाढ

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात मोठ्या प्रमाणावर फळांची आवक वाढत आहे. एपीएमसी फळ बाजारात फळांची आवक वाढल्याने फळ बाजाराबाहेर वाहनांची लांबचलांब रांग लागली होती. त्यामुळे एपीएमसी फळ बाजार आवाराबाहेर १० मार्च रोजी दुपार पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

सध्या उन्हाचा पारा चढत असल्याने रसदार फळांची मागणी वाढत आहे. त्यामुळे एपीएमसी फळ बाजारात कलिंगड, टरबूज, पपई या फळांची आवक वाढली आहे. तसेच रमजान निमित्ताने कलिंगड, टरबूज, पपई या फळांना अधिक मागणी असते. त्यामुळे सध्या एपीएमसी फळ बाजारात फळांची आवक वाढत आहे. १० मार्च रोजी एपीएमसी फळ बाजारात ३५० पेक्षा अधिक वाहनांतून फळांची आवक झाली. यात सर्वाधिक कलिंगड आणि खरबूज फळांचा समावेश होता. एपीएमसी फळ बाजारात कलिंगड ६१३२ क्विंटल आणि टरबूज २७३० क्विंटल आवक झाली. मोठ्या प्रमाणात फळांची आवक वाढल्याने एपीएमसी फळ बाजार आवारात जागा कमी पडत होती. त्यामुळे बाजार आवाराबाहेर फळे घेऊन आलेल्या गाड्यांची लांबच लांब रांग लागली होती. या वाहनांच्या गर्दीने वाशी- तुर्भे भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती .

वाहनतळ अभावी एपीएमसी बाजारात वाहनांची कोंडी
वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती आवारातील पाचही बाजारात येणाऱ्या वाहनांना पार्किंगसाठी सध्याच्या स्थितीत जागा उपलब्ध नाही. एपीएमसी बाजारातील मोठ्या वाहनांना ट्रक टर्मिनस मध्ये एकमेव पार्किंग व्यवस्था होती. मात्र, या ठिकाणीही आता सिडको तर्फे गृहसंकुल प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यामुळे एपीएमसी मार्केट मधील पार्किंग समस्या जटील बनत आहे. आता एपीएमसी फळ बाजारात सध्या हापूस आंबा हंगाम सुरु असून, तसेच रमजान निमित्ताने रसदार फळांची मागणी वाढत आहे. त्यामुळे कलिंगड, खरबूज, पपई या फळांची आवक देखील वाढत आहे. रात्रीपासूनच एपीएमसी फळ बाजारात फळांच्या गाड्या येण्यास सुरुवात होते. मात्र, वाहनांकरता पार्किंग व्यवस्था उपलब्ध नसल्याने एपीएमसी मार्केट बाहेरील रस्त्यावर दोन लेनमध्ये वाहने उभी केली जातात. त्यामुळे इतर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडकोकडून उलवे येथील कत्तलखान्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई