महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
महापालिकेत सीपीआर कार्यशाळेचे आयोजन
ठाणे : आपत्कालीन परिस्थितीत जर एखाद्याचा जीव वाचवायची वेळ आली तर सर्वप्रथम त्या व्यक्तीला सीपीआर म्हणजेच कार्डिओप्ल्मोनरी रिसुसिटेशन अर्थात जीवनसंजीवनी देवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण देणारी कार्यशाळा ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आली होती. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी देखील सीपीआर कशा पध्दतीने करावे याचे प्रात्याक्षिकाद्वारे प्रशिक्षण घेतले. दरम्यान, अशा प्रकारचे महत्वपूर्ण प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल आयुक्त राव यांनी आरोग्य विभागाचे कौतुक केले.
सदर कार्यशाळेस महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह अतिरिक्त आयुक्त-२ प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चेतना नितील के. तसेच महापालिकेतील कर्मचारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणाचे आयोजन इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेसिओलॉजिस्ट आणि डॉ. राजन जोशी यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी डॉ. श्वेता पाटील, डॉ. विराल हरिया उपस्थित होते. सीपीआर अर्थात जीवनसंजीवनी देण्यासाठी डॉक्टर असण्याची गरज नसते. आपत्कालिन परिस्थितीत व्यक्तीचा जीव वाचविणे महत्वाचे असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला सीपीआर कसा द्यावा ते माहित असणे गरजेचे आहे. सीपीआर म्हणजेच हृदय थांबले किंवा श्वास बंद झाल्यावर जीवन वाचविण्यासाठी दिला जाणारा एक महत्वपूर्ण उपचार, यात छातीवर दाब देणे आणि श्वास देणे याचा समावेश असल्याचे डॉ. राजन जोशी यांनी यावेळी नमूद केले.
एखादा व्यक्ती रस्त्यात किंवा कार्यालयात बेशुध्द पडली तर सर्वप्रथम त्याला सुरक्षित ठिकाणी हलवावे. सीपीआर देताना रुग्ण जागा आहे का तपासावे. रुग्णाच्या छातीच्या मध्यभागी दोन्ही हात ठेवून त्यावर जोरात दाब द्यावा. तो रुग्ण शुध्दीवर येईपर्यत किंवा डॉक्टर येईपर्यत सीपीआर करत रहावे. सीपीआर करताना जर रुग्णाने प्रतिसाद दिला नाही तर तात्काळ १०८ या क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे. सीपीआरमुळे एखाद्या व्यक्तीचे जीवन वाचू शकते. त्यामुळे सीपीआर कसा द्यावा याचे प्रशिक्षण सर्वांनी घेणे आवश्यक असल्याचेही डॉ. जोशी म्हणाले.
यावेळी डॉ. जोशी यांनी सीपीआर देण्यासाठी तयार करुन आणलेल्या मानवी प्रतिकृतीच्या माध्यमातून प्रात्याक्षिक करुन दाखविले. आयुक्त सौरभ राव यांनी देखील सीपीआर पध्दत कशी वापरावी याचे प्रशिक्षण घेतले. तसेच कार्यशाळेस उपस्थित असलेल्या सर्वांकडून सदर प्रात्याक्षिक करुन घेण्यात आले.