बापगांवच्या ३ खेळाडुंची जिम्नॅस्टिक्सच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
भिवंडी : सर्व खेळाचा पाया असलेल्या जिम्नॅस्टिक्स या ऑलिम्पिक खेळ प्रकाराकडे खेळाडुंचा कल वाढत आहे. भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील आकार जिम्नॅस्टिक्स सेंटरमधील ३ खेळाडू ट्रॅम्पोलीन जिम्नॅस्टिक्सच्या चॅम्पियनशिप राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवडले गेले आहेत.
चिराग केणे (सब ज्युनिअर), अभिप्रीत विचारे (ज्युनिअर) आणि वार्या पाटील, टंबलिन (ज्युनिअर) असे ३ खेळाडू ८ ते १० ऑगस्ट दरम्यान डेहराडून येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी कसून सराव करीत आहेत.बापगाव येथील आकार जिम्नॅस्टिक्स सेंटर मध्ये आजवर शेकडो खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत नावलौकीक मिळवला आहे. या तिन्ही खेळाडुंनी राज्यस्तरावर आपल्या खेळाची चमक दाखविल्याने ते राज्य संघात स्थान मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. या खेळाडुंना मुख्य प्रशिक्षक निशांत यशवंतराव यांचे मार्गदर्शन आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेता, शिवछत्रपती पदक विजेता प्रशिक्षक अभिजीत ईश्वर शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
दरम्यान, बापगांव येथील जिम्नॅस्टीक केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाची उपकरणे, ट्रॅम्पोलीन, टम्बलिंग ट्रॅक, पलोअरिंग, सेपटी मॅटस् आणि अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध असल्याने ऑलिम्पिक स्पर्धेत निवड झालेले देशभरातील खेळाडू या केंद्रात सरावासाठी येतात, असे प्रशिक्षक अभिजित शिंदे यांनी सांगितले.