‘नमुंमपा'च्या ८० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव
नवी मुंबई : शासनाच्या शालेय शिक्षण-क्रीडा विभाग यांच्याकडून प्राप्त झालेल्या १२ मार्च २०२५ रोजीच्या पत्रानुसार १०० शाळांना भेटी असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या अनुषंगाने मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यावर्षीच्या शालेय वर्ष आरंभाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १६ जून रोजी एकेक शाळेमध्ये भेट देऊन नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.
याकरिता नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागामार्फत महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे. कोणत्या शाळांना कोणते अधिकारी भेट देतील याचे पूर्व नियोजन करण्यात आलेले असून शालेय स्तरावर मुख्याध्यापकांनाही याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागताकरिता गुलाबाची फुले, चॉकलेट व्यवस्था तसेच रांगोळी सजावट, वर्ग सजावट करणे, शैक्षणिक साहित्यांचे प्रदर्शन भरविणे, सेल्फी पॉईंट करणे, लेझीमच्या तालावर ढोलताशांच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करणे अशा विविध प्रकारे सदर शालेय आरंभ दिन उत्साहात साजरा केला जाणार आहे.
या अनुषंगाने महापालिकेच्या प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छता झालेली असून वर्गसजावटीचेही काम सुरु आहे. सुट्टीच्या कालावधीत शाळेला आवश्यक रंगरंगोटीही करण्यात आलेली आहे. सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन सर्वांना शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत माहिती दिलेली आहे. मान्यवर व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलेले आहे.
यादिवशी नवीन विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा संच दिला जाणार असून त्याकरिता पाठ्यपुस्तके शाळांपर्यंत पोहोचलेली आहेत. शाळांनी पाठ्यपुस्तकांवर शाळेचे शिक्के मारुन ती वाटप करण्यासाठी तयार ठेवलेली आहेत. विद्यार्थ्यांचे औक्षणही केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, त्यांना कोणत्याही प्रकारचे दडपण वाटू नये आणि दडपण विरहित आनंददायी वातावरणामध्ये शाळेमध्ये त्यांनी पहिले पाऊल ठेवावे, असा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असून त्यादृष्टीने ‘नमुंमपा'च्या ८० शाळांमध्ये या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या नियंत्रणाखाली नियोजन करण्यात आलेले आहे. मान्यवरांनी शाळेला भेटी दिल्यानंतर शाळा भेटीचा फॉर्म भरुन ठेवण्याबाबतची तयारीही पूर्ण झालेली आहे. अशाप्रकारे १६ जून रोजी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षण विभागाची सर्व यंत्रणा सुसज्ज आहे.