झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यास सुरुवात

ठाणे : दरवर्षी ठाणे महापालिका तर्फे पावसाळ्यापूर्वी मे आणि जून महिन्यामध्ये झाडांच्या धोकादायक फांंद्यांची छाटणी केली जाते. मात्र, पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे आणि अन्य नैसर्गिक कारणांमुळे काही झाडे उन्मळून पडतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास आणि मालमत्तेस धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर, संभाव्य धोके टाळण्यासाठी यावर्षी नियोजित वेळेच्या दोन महिने आधीपासूनच म्हणजेच मार्च महिन्यापासूनच धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, रुग्णालये, उद्याने, चौक, बस स्टॉप आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्याची छाटणी करण्यात येत आहे. पावसाळ्यात विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्यांचा संपर्क होवून अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तांत्रिक दृष्टीने फांद्या छाटणी केली जात आहे. त्यासाठी प्रभाग समितीनिहाय सर्वेक्षण करण्यात आले असून सुमारे ६३६७ झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात येत आहेत, असे अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी स्पष्ट केले.

सदर मोहिमेची माहिती देण्यासाठी महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात ‘पत्रकार परिषद'चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (उद्यान) मधुकर बोडके, वृक्ष अधिकारी राजेश सोनावणे, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील उपस्थित होते.

नौपाडा-कोपरी (९५४), उथळसर (७९८), लोकमान्य नगर-सावरकर नगर (७८७), वागळे (७३७), माजिवडा-मानपाडा (१०९१), वर्तकनगर (१३०१), कळवा (४२३), मुंब्रा आणि दिवा (२७६) येथे झाडांचे सर्वेक्षण झाले आहे. याशिवाय आतापर्यंत सुकलेली सुमारे १५० झाडे निर्दशनास आली असून त्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन ती झाडेही तोडण्यात येणार आहेत. उन्हाळ्यात झाडांच्या सावलीचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांना मिळावा आणि झाडांची नैसर्गिक वाढ अबाधित रहावी, यासाठी अत्यावश्यक असेल तेथेच धोकादायक फांद्यांची छाटणी केली जात आहे. या दरम्यान झाडांवरील पक्षांची घरटी आणि इतर जैवविविधता सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचेही अतिरिक्त आयुक्त माळवी म्हणाले.

‘वृक्ष प्राधिकरण'मार्फत ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभागातील माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांच्याशीही सदर मोहिमेबाबत संपर्क साधण्यात आला आहे. त्यांच्याशी समन्वय साधून आवश्यक त्या ठिकाणी झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येत असल्याचेही माळवी यांनी नमूद केले. यातून निर्माण होणारा हरित कचरा संकलित करुन शास्त्रशुध्द पध्दतीने सेंद्रिय खत निर्मितीकरिता महापालिकेच्या कोपरी येथील हरित कचरा व्यवस्थापन केंद्राकडे पाठविण्यात येत असल्याचेही माळवी म्हणाले.

तक्रार नोंदवण्यासाठी संपर्क क्रमांकः

धोकादायक झाडांबाबत नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी १८००-२२२-१०८ आणि ८६५७८८७१०१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

महापालिका उद्यान विभागाने धोकादायक, सुकलेल्या झाडांचे सर्वेक्षण केलेले आहे. नागरिकांनीही परिसरातील धोकादायक झाडांबाबत महापालिका वृक्ष प्राधिकरण विभागास त्वरित माहिती द्यावी. मोहीम केवळ झाडांची छाटणी करण्यापूर्ती मर्यादित न राहता शहरातील हरित क्षेत्र टिकविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करावे.
-संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त -ठाणे महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आयुक्त अनमोल सागर यांच्या ‘खेलो लातूर' उपक्रमाचा गौरव