खेळाचे स्टेडियम बनले डम्पिंग ग्रांऊंड
भिवंडी : भिवंडी महापालिका प्रभाग समिती क्र.४ च्या कार्यालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या स्व.परशराम धोंडू टावरे स्टेडियम मधील मैदानांची आणि इमारतींची दिवसेंदिवस दुरावस्था होऊ लागली आहे. त्याची दुरुस्ती करून ती खेळाडुंच्या उपयोगात आणण्या ऐवजी त्या मैदानातील जागेवर शहरातील माती आणि डेब्रीज साठविण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु असल्याने परिसरातील नागरिकांनी आणि खेळाडुंनी संताप व्यक्त केला आहे. अशाप्रकारे अनागोंदी कारभार करणाऱ्या प्रभाग अधिकाऱ्यांसह अधीक्षक आणि क्रीडा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
स्व.परशराम टावरे स्टेडियम लगत महापालिका प्रभाग समिती क्र. ४ चे कार्यालय आहे. दररोज या स्टेडियम मधील रस्त्यावरून प्रभाग कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी कार्यालयात ये-जा करतात. असे असताना स्टेडिअमच्या मैदानात डबर आणि माती आणून टाकणाऱ्यांवर प्रभाग अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात नाही. अशा दुष्कृत्यांना बढावा देणारे महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने महापालिका प्रशासनाबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
स्थानिक सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील अनेक ठेकेदार जुन्या इमारती पाडतात आणि त्या इमारतीचे डेब्रीज ,माती आणि इतर कचरा थेट या स्टेडियमच्या भिंतींच्या लगत आतल्या बाजुला टाकतात. नंतर त्याच ठिकाणाहून तो चढ्या किंमतीत विकतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सदर सर्व प्रभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांसमोर उघडपणे घडत आहे. परंतु, भिवंडी महापालिका प्रशासन आणि प्रभाग अधिकारी यावर कोणतीही कारवाई करत नाही. वास्तविक स्टेडियम मधील मैदानात अनेक स्थानिक क्रिकेट टीम खेळतात. तर मागील काही दिवसांमध्ये आमदार महेश चौघुले यांनी ऑलम्पिक दर्जाची स्पर्धा भरवून स्थानिक खेळाडुंना प्रात्साहन दिले होते. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून या स्टेडियम मधील काही छोट्या मैदानात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्न समारंभ आयोजित केले जातात. त्यामुळे महापालिकेस चांगला महसूल मिळत आहे. असे असताना त्याच मैदानाच्या काही भागात जमा झालेल्या डेब्रीजच्या कचऱ्यामुळे स्टेडियम परिसरात सर्वत्र धूळ, घाण आणि कचरा जमा झाला आहे. पावसाळ्यात या ढिगाऱ्यामुळे पाणी साचून मोठ्या संख्येने डासांची पैदास होणार आहे. स्टेडिअमच्या आजुबाजुला लोकवस्ती असून डेब्रीजच्या कचऱ्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया सारखे संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
खेळाडू आणि नागरिकांचे सांगणे आहे कि, खेळाच्या मैदानाचे कचराकुंडीत रुपांतर करणे केवळ क्रीडा भावनेचा अपमान नाही तर ‘स्वच्छ भारत अभियान'चाही अवमान आहे. स्टेडियमचे मैदान तातडीने कचऱ्यापासून मुक्त करावे आणि जबाबदार कंत्राटदारांसह प्रभाग अधिकारी यांनी दंड करावा, अशी मागणी खेळाडू आणि नागरिकांनी केली आहे.
स्व. परशराम टावरे स्टेडियम मैदानात भिंतीलगत डेब्रीजचा कचरा साठविल्याबाबत आमच्याकडे नागरिकांच्या आणि माजी नगरसेवकांच्या तक्रारी आल्या आहेत. यावर कार्यवाहार्ी करुन सदर कचरा हटविला जाणार आहे. त्याचबरोबर सदरचे कृत्य करण्यास प्रोत्साहित करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
-बाळकृष्ण क्षीरसागर, उपायुक्त-भिवंडी महापालिका.