पत्नीसोबत भांडण; पोलीस अंमलदाराची आत्महत्या

नवी मुंबई : सानपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस शिपाई स्वप्नील अशोक लोहार (३५) यांनी फोनवरुन पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उलवे मध्ये घडली. लोहार यांच्या पत्नीने उलवे पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केल्यानंतर आत्महत्येचा सदर प्रकार उघडकीस आला.

मृत स्वप्नील लोहार नवी मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. सध्या त्यांची नेमणूक सानपाडा पोलीस स्टेशन मध्ये होती. स्वप्नील लोहार, उलवे सेक्टर-२४ मधील एकनाथ सदन इमारतीत पत्नी आणिा मुलासह राहत होते. दोन दिवसापूर्वी स्वप्नील लोहार यांचे पत्नी सोबत घरगुती कारणावरुन भांडण झाले होते. त्यामुळे त्यांची पत्नी औरंगाबाद येथे मुलासह निघून गेली होती. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास फोनवरुन या दोघा पती-पत्नी मध्ये वाद होऊन भांडण झाले. यावेळी स्वप्नील लोहार यांनी आत्महत्या करत असल्याचे व्हिडिओ कॉलवरुन पत्नीला धमकी दिली होती.

त्यानंतर स्वप्नील लोहार यांच्या पत्नीने तत्काळ शेजाऱ्यांना माहिती दिल्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतून कोणताही प्रतिसात मिळाला नाही. त्यानंतर लोहार यांच्या पत्नीने उलवे पोलीस पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ लोहार यांच्या घरी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, स्वप्नील लोहार घरातील बेडरुममध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. यावेळी पोलिसांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उलवे पोलिसांनी या प्रकरणी अप मृत्युची नोंद करुन पुढील कार्यवाही सुरु केली आहे.

हरहुन्नरी कलाकार हरपल्याने पोलीस दलात हळहळ...
मृत पोलीस शिपाई स्वप्नील लोहार पोलीस दलात असले तरी ते एक चांगले स्पोर्टस्‌मन होते. बॉक्सर म्हणून त्यांची ओळख होती. त्याशिवाय ते एक चांगले गायक देखील होते. नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या वतीने दिवाळी निमित्त गतवर्षी आयोजित जल्लोष वर्दीतल्या दर्दींचा या कार्यक्रमात स्वप्नील लोहार यांनी गाणे सादर करुन उपस्थितांचे मन जिंकले होते. अशा हरहुन्नरी कलाकाराचे अकाली मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई