बेलापूर परिमंडळावर उपायुक्त अमित काळे यांची नियुक्ती
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत नव्याने तिसरे (बेलापूर )परिमंडळ स्थापन करण्यात आल्यामुळे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांची नव्याने स्थापन झालेल्या बेलापूर (२) परिमंडळाचे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर वाशी व पनवेल परिमंडळाचे उपायुक्त कायम ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्वात क्रीम पोस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त पदी पोलीस आयुक्तांनी अद्याप कोणाची नियुक्ती न केल्यामुळे या पदावर आपली वर्णी लागावी म्हणून सध्या नवी मुंबई व नवी मुंबई बाहेरील पोलीस उपायुक्तांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यासाठी अनेक उपायुक्त दोन दिवसापासून गृह विभागात जोडे झिजवत आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले असल्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या उपायुक्त पदी अद्याप कोणा अधिकाऱ्याची नियुक्ती होऊ शकलेली नाही. गृह विभागात ज्याचा वशिला मोठा त्याची लॉटरी लागणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात साईड पोस्टिंगवर कार्यरत असलेले उपायुक्त देखील गुन्हे शाखेच्या उपयुक्तपदी आपली वर्णे लागेल या आशेवर बसले आहेत. तर नवीन परिमंडळ स्थापित झाल्याने आणखीन दोन सहायक पोलीस आयुक्तांची नवी मुंबईत नियुक्ती होणार आहे.
अशी करण्यात आली परीमंडळाची पुनर्रचना
परिमंडळ-१ वाशी मधील पोलीस स्टेशनची संख्या आता ७ करण्यात आली आहे. यात रबाळे विभाग सहाय्यक पोलीस आयुक्तांची वाढ होणार आहे. त्यांच्या अधिपत्याखाली रबाळे, रबाळे एमआयडीसी, कोपरखैरणे या ३ पोलीस स्टेशनचा समावेश असणार आहे. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त वाशी यांच्या अधिपत्याखाली वाशी, एपीएमसी, तुर्भे आणि सानपाडा या ४ पोलीस स्टेशनचा समावेश असणार आहे.
तर नव्या परिमंडळ-२ बेलापूर मधील पोलीस स्टेशनची संख्या ८ करण्यात आली आहे. यात बेलापूर सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखाली सीबीडी, एन आर आय, नेरुळ व प्रस्तावित विमानतळ या ४ पोलीस स्टेशनचा समावेश आहे. तर पोर्ट विभागाच्या अधिपत्याखाली उलवा, न्हावा-शेवा, उरण आणि मोरा सागरी या ४ पोलीस स्टेशनचा समावेश असणार आहे.
त्याचबरोबर परिमंडळ- ३ मधील पोलीस स्टेशनची संख्या ७ होणार असून यात खारघर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांची भर पडणार आहे. त्यांच्या अधिपत्याखाली खारघर, कळंबोली, कामोठे आणि तळोजा या ४ पोलीस स्टेशनचा समावेश असणार आहे. तर पनवेल विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अधिपत्याखाली पनवेल शहर, पनवेल तालुका, खांदेश्वर या ३ पोलीस स्टेशनचा समावेश असणार आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याची निर्मिती लवकरच
नवी मुंबई विमानतळाचे काम वेगाने सुरु असून लवकरच ते पूर्णत्वास येणार आहे. विमानतळाच्या सभोवताली नागरीकरण विकसित झालेले आहे. विमानतळ आणि त्याच्या आजुबाजुच्या परिसराची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची गरज असल्याने पोलीस आयुक्तालयाने विमानतळ पोलीस स्टेशन देखील प्रस्तावित केले आहे. येत्या काही दिवसामध्ये हे पोलीस स्टेशन देखील कार्यान्वित होणार असल्याचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले.