कल्याणसारख्या ‘ज्ञान केंद्र'ची राज्यभरात उभारणी
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक'चे दिमाखदार लोकार्पण
कल्याण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जनसामान्यांमध्ये पोहोचवण्याचे महत्वाचे कार्य कल्याण येथे उभारण्यात आलेल्या ‘ज्ञान केंद्र'च्या माध्यमातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करीत आहेत. अशी ज्ञान केंद्रे संपूर्ण राज्यात उभारली जातील, अशी घोषणा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी कल्याण येथे केली.
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून कल्याण-डोंबिवली महापालिका ड-प्रभाग कार्यालयाशेजारी उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील ‘ज्ञान केंद्र'चे लोकार्पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला १३ एप्रिल रोजी उद्योगमंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे अपरिहार्य कारणामुळे दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट होलोग्राफी, विविध माहितीपटाच्या माध्यमातून येथे उलगडण्यात आला आहे. शेकडो पुस्तकांचे ग्रंथालयही यात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास, त्यांचे साहित्य, त्यांची आंदोलने आणि विचार होलोग्राफीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी आता कल्याणकरांना मिळणार आहे.
यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या स्मारकाचा प्रवास उलगडून सांगितला. स्थानिकांची मागणी होती, त्यानुसार सदर स्मारक उभे राहिले. यात ‘संघर्ष समिती'पासून अनेकांचे योगदान आहे, असे यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. परस्पर संवादी (इंटरॅक्टिव) पध्दतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जीवनगाथा कळावी, असे ज्ञान केंद्र उभारण्या मागचा मुख्य हेतू होता. या केंद्रात एक ते दीड तासात आगळा-वेगळा अनुभव मिळेल. सदर स्मारकासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि पाठबळ देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही डॉ. शिंदे यांनी आभार मानले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपूर्वी स्मारकातील ज्ञान केंद्र सुरू करू असा आम्ही दिलेला शब्द आज पूर्ण केला, असेही यावेळी खासदार शिंदे म्हणाले.
नागरिकांच्या मागणीनुसार आणि वेगळ्या संकल्पना अंमलात आणण्यासाठी इच्छाशक्ती लागते, ती इच्छाशक्ती खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे आहे, असे गौरवोद्गार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी यावेळी काढले. या स्मारकाची कॉपी आम्हीही करणार. राज्यभर असे ज्ञान केंद्र उभारणार, अशी घोषणा यावेळी ना. संजय शिरसाठ यांनी केली.
तर बाबासाहेबांचे विचार जनसामान्यांमध्ये पोहोचवण्याचे काम डॉ. श्रीकांत शिंदे करीत आहेत. सदर संकल्पनाच खूप मोठी आहे. त्यामुळे असे ज्ञानकेंद्र संपूर्ण राज्यात उभे करायला हवेत, असे मत यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यवत केले. या ‘ज्ञान केंद्र'ची प्रतिकृती आम्हीही साकारणार, असेही यावेळी सामंत म्हणाले. ज्या रत्नागिरीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपुत्र आहे, त्याच जिल्ह्याचा मी पालकमंत्री असल्याचा मला अभिमान आहे, असेही सामंत यावेळी म्हणाले. लोकांच्या मागण्या पूर्ण करणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. खासदार श्रीकांत शिंदे कायमच नागरिकांच्या मागण्या पूर्ण करतात. मी कल्याणमध्ये जेव्हा प्रचारासाठी आलो, तेव्हा लोक म्हणाले तुम्हाला यायची गरज नाही. खासदार आधीच निवडून आलेले आहेत, असा विश्वास इथल्या जनतेने दाखवला, असेही कौतुक सामंत यांनी केले.
सदर दिमाखदार सोहळ्या शेकडोच्या संख्येने आंबेडकर अनुयायी उपस्थित होते. तसेच याप्रसंगी ‘कल्याण ग्रामीण'चे आमदार राजेश मोरे, ‘कल्याण पूर्व'या आमदार सुलभा गायकवाड, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती'चे आण्णा रोकडे, कल्याण- डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनल गोयल, ‘शिवसेना'चे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, निलेश शिंदे, प्रशांत काळे, महेश गायकवाड, किरण सोनावणे, रमाकांत देवळेकर, ‘शिवसेना-भाजपा'चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.