घोडबंदर रोडवर अवजड वाहनांना रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत परवानगी

ठाणे : घोडबंदर सेवा रस्त्याच्या मुख्य रस्त्यात विलिनीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत दिवसा या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक थांबवणे आवश्यक आहे. तरच नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळू शकेल. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी मिरा-भाईंदर आणि पालघर वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून घोडबंदर रस्त्यावरील अवजड वाहनांना मध्यरात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंतच परवानगी द्यावी. त्याबद्दलची अधिसूचना लवकरात लवकर काढावी, असे निर्देष परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

त्याचबरोबर घोडबंदर सेवा रस्त्याच्या विलिनीकरणाचे उर्वरित काम १५ सप्टेंबरपासून सुरु करुन ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात यावे. त्यासाठी ‘एमएमआरडीए'ने आखलेल्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन व्हावे, असेही ना. प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांबाबत आढावा घेण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालय येथील कै. अरविंद पेंडसे सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, उप जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, उपनगर अभियंता विकास ढोले, सुधीर गायकवाड, विनोद पवार, गुणवंत झांब्रे, शुभांगी केसवानी, उपायुक्त शंकर पाटोळे, मनीष जोशी, दिनेश तायडे, मधुकर बोडके, बैठकीचे समन्वय अधिकारी कार्यकारी अभियंता संजय कदमल यांच्यासह महापालिका, म्हाडा, एमएमआरडीए यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी, तिसरे नाट्यगृह, वर्तकनगर येथील म्हाडा आणि शॉप किपर्स सोसायटीचा विषय, नागला बंदर येथील आरमार प्रकल्प, समाज मंदिरे, लता मंगेशकर संगीत विद्यालय, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय, तलाव सुशोभिकरण, स्वामी समर्थ मठाचे स्थलांतर यांच्यासह ओवळा-माजिवडा क्षेत्रातील सर्व विकास कामांचा आढावाही घेण्यात आला.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधून कामांची गती चांगली राखली आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबर पर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपुजन करणे शक्य होईल, असेही नामदार सरनाईक यांनी स्पष्ट केले.

श्वान पुनर्वसन केंद्रासाठी जागा द्यावी...
ठाणे शहरात भटक्या श्वानांचा नागरिकांना त्रास होत आहे. त्या श्वानांचा बंदोबस्त करावा. अशा अनेक तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. त्यादृष्टीने शहराच्या बाहेर जुन्या जकातनाक्यांच्या परिसरात भटक्या श्वानांच्या पुनर्वसन केंद्रासाठी महापालिकेने जागा द्यावी. त्यांचे व्यवस्थापन स्वयंसेवी संस्था करतील, अशी सूचना ना. सरनाईक यांनी आयुक्त सौरभ राव यांना केली.

पॉड टॅक्सी प्रकल्पाचे सादरीकरण...
ठाणे शहरातील मेट्रो आणि अंतर्गत मेट्रो सेवेला पुरक ठरेल अशी भविष्यकालीन वाहतूक व्यवस्था म्हणून पॉड टॅक्सी या प्रकल्पाचा विचार सुरु आहे. त्या प्रकल्पाच्या प्राथमिक आरखड्याचे सादरीकरण बैठकीत खाजगी कंपनीद्वारे करण्यात आले. सदर प्रकल्प पीपीपी तत्वावर केला जाणार आहे. या प्रकल्पातील प्रवासी  सुरक्षितता, कायदेशीर मान्यता आणि कंपनीची आर्थिक व्यवहार्यता तपासून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन नामदार सरनाईक यांनी केले. सुमारे ५२ कि.मी. लांबीचा मार्ग असलेल्या पॉड टॅक्सी प्रकल्पात अंदाजे ७६ स्थानके असतील. तसेच पॉड टॅक्सीचा दर ३० रुपये प्रति माणशी असेल. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व कायदेशीर बाबी लवकरात लवकर पूर्ण करुन सविस्तर प्रकल्प आराखडा सादर करावा, असे आयुक्त सौरभ राव यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी