एकाच कुटुंबातील ६ जणांना विषबाधा

भाईंदर : भाईंदर पश्चिम भागातील जय बजरंगनगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मौर्या कुटुंबातील ६ जणांना विषबाधा झाली असून त्यातील ३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या इतर ५ जणांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दरम्यान, विषबाधा नक्की कशी झाली? याबाबत संशयास्पद वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला बोलाऊन खाद्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून काही इतर कारणांचा शोध घेत आहेत.

भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्ली परिसरातील जय बजरंगनगर झोपडपट्टीमध्ये रमेश मौर्या (३०), त्यांची पत्नी नीलम (२८), चाहत, अनामिका या दोन मुली तसेच भाऊ राजकुमार मौर्या असे राहतात. रमेश आणि राजकुमार दोघे कामावरुन परत आल्यावर कुटुंबियांनी जेवण केले, त्यानंतर सर्वांना उलट्या, जुलाब याचा त्रास सुरु झाला. त्यांना सरकारी भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात दीपाली मौर्या (३ वर्ष) या चिमुकलीचा मृत्यू झाला. तर अन्य ५ जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

रमेश मौर्या शुध्दीवर आल्यावर पोलिसांनी त्यांचा जबाब घेतला असता त्यांनी केव्हा बेशुध्द झालो ते आठवत नसल्याचे सांगितले. तर दुसऱ्या वेळेस कामावरुन सुटल्यावर मद्य आणि कोंबडी खरेदी केल्याचे सांगितले. परंतु, पोलिसांना मद्याची न उघडलेली बाटली सापडली. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अन्न विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. पोलिसांना मात्र काहीतरी संशयास्पद वाटत असल्याने त्यांनी फॉरेन्सिक पथकाला बोलाऊन घरातील अन्नाचे नमुने, विकत आणलेला वडापाव, उलटी केलेले नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. तसेच घरात गॅस गळती झाली होती का? याचीही चौकशी करण्यासाठी व्ही.सी. शाह गॅस एजन्सी, हिंदुस्थान पेट्रोलियम गॅस डिस्ट्रिब्युटर यांना तपासणी करण्यास बोलाविले. मात्र, मौर्या यांच्या घरात गॅस गळती झाली नसल्याचे निष्पन्न झाले. संशयास्पद वातावरण निर्माण झाल्याने पोलीस सखोल चौकशी आणि तपास करत असून फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासाला योग्य दिशा मिळेल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी सांगितलेे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडको संपादित विस्थापित गावांना मिळणार जुनी ओळख