शहर स्वच्छतेला बाधा

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील स्वच्छतेला बाधा पोहोचविणाऱ्या बेवारस वाहनांविरुध्द महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागामार्फत विशेष मोहीम हाती घेऊन १० ते १६ मार्च या कालावधीत ६६ दुचाकी, ३४ चारचाकी आणि ७ रिक्षा- टेम्पो अशी १०७ विविध प्रकारची बेवारस वाहने उचलून घेण्यात आली आहेत. या मोहिमेबद्दल नागरिकांकडून मोठया प्रमाणावर समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी बऱ्याच दिवसांपासून रस्त्याच्या कडेला तसेच पदपथावर वाहने उभी असल्याने त्याठिकाणी  रस्ते आणि पदपथ सफाई करणे शक्य होत नाही. काही वाहने तर अनेक दिवसांपासून उभी असल्याने त्यावर धुळीचे लोट चढलेले दिसून येतात. या वाहनांचे मालक, चालक यांच्याकडून त्यांची निगा राखली जात नसल्याचे तसेच दखल के घेतली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, यामुळे सुनियोजित आणि स्वच्छ शहर असा लौकिक असणाऱ्या नवी मुंबई शहर स्वच्छतेला बाधा पोहोचत असल्याचे दिसून येते.

याबाबत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठकीत अशा बेवारस वाहनांवर कारवाईचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त भागवत डोईफोडे यांच्या मार्फत आठही विभाग कार्यालयाच्या सहा.आयुक्त यांना बेवारस वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले होते.

यानुसार विभाग कार्यालयामार्फत आपापल्या क्षेत्रात रस्त्यांवर, पदपथांवर उभ्या असलेल्या बेवारस वाहनांचे सर्वेक्षण करण्यात आले. परिसरामध्ये सदर बेवारस वाहने ज्यांची आहेत त्यांनी घेऊन जावीत, असे आवाहन करण्यात आले. मात्र, त्यानंतरही उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर नोटिसा चिटकविण्यात आल्या. या नोटिसांनाही प्रतिसाद न देणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करीत सदर वाहने टोईंगद्वारे उचलून कोपरखैरणे, सेवटर-१४ येथे नेण्यात आली.

या अंतर्गत बेलापूर विभागात १२ दुचाकी आणि १ चारचाकी, नेरुळ विभागात ६ चार चाकी वाहने आणि १ रिक्षा-टेम्पो, वाशीमध्ये १७ दुचाकी वाहने आणि १ रिक्षा-टेम्पो, तुर्भे विभागामध्ये २ दुचाकी, १२ चारचाकी आणि २ रिक्षा-टेम्पो अशी एकूण १७ वाहने, कोपरखैरणे विभागातून १७ दुचाकी, ६ चारचाकी आणि १ रिक्षा, घणसोलीमध्ये ८ दुचाकी आणि ४ चारचाकी अशी १२ वाहने, ऐरोली विभागातून १० दुचाकी, ५ चारचाकी आणि २ रिक्षा-टेम्पो तसेच दिघा विभागात ८ दुचाकी, ४ चारचाकी आणि रिक्षा-टेम्पो अशी बेवारस वाहने उचलून नेण्यात आली.

दरम्यान, उचलून नेण्यात आलेली सदर १०७ वाहने कोपरखैरणे येथे जमा केल्यानंतर ती सोडविण्यासाठी आलेल्या वाहन मालकांकडून त्या वाहनाची कागदपत्रे तपासून आणि रितसर दंडात्मक शुल्क आकारुन ते वाहन संबधितांच्या ताब्यात देण्यात आले.

बेवारस वाहनांविरोधातील सदर विशेष मोहीम अशीच सुरु राहणार असून या पुढील काळात अधिक तीव्र स्वरुपात राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेचा दर्जा उंचाविण्यासाठी आपली वाहने योग्य ठिकाणी पार्क करावी वाहने उभी केल्याने शहराच्या नियमित दैनंदिन स्वच्छता कामाला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पाणीटंचाई विरोधात मटका फोडो आंदोलन