हेदोरावाडी पाडा मधील बोअरवेल दोन वर्षांनी सुरु
खारघर : खारघर मधील हेदोरावाडी आदिवासी पाड्यातील बंद अवस्थेत असलेली बोअरवेल दोन वर्षांनी सुरु झाल्यामुळे हेदोरावाडी ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत.
खारघर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे रहिवाशांना वॉटर टँकर मागवून पाणी विकत घ्यावे लागत आहे. दरम्यान, खारघर सेक्टर-५ मध्ये डोंगर पायथ्याशी असलेल्या हेदोरावाडी आदिवासी पाड्यात पाणी टंचाई असल्यामुळे ‘दैनिक आपलं नवे शहर' मध्ये ‘हेदोरावाडी आदिवासी पाडा'मध्ये ‘पाणी टंचाई' या मथळ्याखाली ८ मे रोजी बातमी प्रसिध्द होताच पनवेल महापालिका पाणी पुरवठा विभागाने हेदोरावाडी आदिवासी पाड्यातील गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली बोअरवेल सुरु केली आहे. तसेच सिडको कडून पाणी पुरवठा उपलब्ध केला जात असल्यामुळे हेदोरावाडी ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, हेदोरावाडी आदिवासी पाड्यातील पाणी टंचाई विषयी स्थानिक कार्यकर्त्यांना माहिती दिली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे हेदोरावाडी मधील रहिवाशांनी सांगितले.
हेदोरावाडी आदिवासी पाड्यातील बोअरवेल गेल्या दोन वर्षांपासून बंद पडली होती. याशिवाय सिडकोकडून पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे हेदोरावाडी आदिवासी पाड्यातील रहिवाशांना विशेषतः महिलांना हेदोरावाडी आदिवासी पाडा शेजारील हौसिंग सोसायटी तसेच खाजगी समाज मंदिर ट्रस्ट यांच्याकडून पाणी घेवून पाण्याची गरज पूर्ण करावी लागत होती. मात्र, ‘हेदोरावाडी आदिवासी पाडा'मध्ये ‘पाणी टंचाई' या मथळ्याखाली ८ मे रोजी ‘आपलं नवे शहर' मध्ये बातमी प्रसिध्द होताच पनवेल महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने हेदोरावाडी मधील बोअरवेल दुरुस्ती केली आहे. याशिवाय हेदोरावाडी मध्ये ‘सिडको'कडून पाणी उपलब्ध होत आहे.
दरम्यान, हेदोरावाडी आदिवासी पाड्यालगत भूमिगत असलेल्या पाणी टांकाची बंद असलेली मोटार लवकरच दुरुस्त करण्यात येणार आहे, असे पनवेल महापालिका पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.