महापालिका तर्फे भटके श्वान, मांजर यांचे सर्वेक्षण
पनवेल : पनवेल महापालिका हद्दीतील भटक्या श्वानांचे सर्वेक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले असून, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन करण्यात आलेल्या या डिजीटल सर्वेक्षणाद्वारे मिळालेली माहिती भटक्या श्वानांच्या लसीकरणासाठी तसेच निर्बिजीकरणासाठी उपयोगी पडणार आहे. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेले सदर सर्वेक्षण देशात प्रथमच एआय प्रणालीचा वापर करुन महापालिका हद्दीतील श्वानांची डिजिटल माहिती गोळा करण्यात आली आहे. या सर्वेक्षणचा उपयोग ‘रेबीज मुक्त पनवेल'साठी होणार असल्याचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी सांगितलेे.
इंडिकेअर एआय सोल्युशन प्रायव्हेट लि. या स्टार्ट अप कंपनीच्या माध्यमातून डिजीटल सर्वेक्षण करण्यात आले आहे. भारतात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविले गेले आहे. या सर्वेक्षणमध्ये १९,३०७ भटके श्वान आणि ५,०८० भटक्या मांजरीची नोंदणी केली आहे. भटक्या श्वानांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीचा उपयोग होणार आहे. भटक्या श्वानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सदर माहिती उपयोगी पडणार आहे. सदरचे महत्वपूर्ण सर्वेक्षण वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. भगवान गीते आणि डॉ. मधुलिका लाड यांनी केले आहे.
डिजीटल सर्वेक्षणातून मिळालेली माहितीचा वापर महापालिकेच्या पशु वैद्यकीय विभागातर्फे भविष्यातील सूक्ष्म नियोजनासाठी करता येणार आहे. या सर्वेक्षणामुळे भटक्या श्वानाची नसबंदी झाली आहे की नाही? ते कळणार आहे. सदर डिजीटल सर्वेक्षणात श्वान, मांजरीचा फोटो, जेंडर, वय, आरोग्याची स्थिती नमूद करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीस भटका श्वान चावल्यास या सर्वेक्षणातील माहितीमुळे तो श्वान कोणत्या परिसरातील आहे, याचा शोध घेणे सहज शक्य होणार आहे.
दरम्यान, महापालिकेने निर्बिजीकरणाचा कार्यक्रम २०१८ पासून हाती घेतला असून या सर्वेक्षणांतर्गत एकूण ४४ टक्के भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणातून असे दिसून आले की, प्रौढ श्वानांची संख्या १०,२७० एवढी आहे. श्वान पिल्लांची संख्या सुमारे १८०० आहे. तसेच वयस्क श्वानांची संख्या १,४४० एवढी आहे. यावरुन महापालिकेने हाती घेतलेला निर्बिजीकरण कार्यक्रमाचे यश दिसून येत आहे.
रेबीजचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने महापालिकेने केलेले सर्वेक्षण महत्वपूर्ण ठरणार आहे. तसेच भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी देखील सर्वेक्षणाचा उपायोग होणार आहे.
-मंगेश चितळे, आयुक्त-पनवेल महापालिका.