तुर्भे रेल्वे स्थानकातील भुयारी पादचारी मार्गाची दुरवस्था

तुर्भे : ठाणे - बेलापूर मार्गावरील तुर्भे रेल्वे स्थानकातील भुयारी पादचारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

तुर्भे येथे पूर्वेकडील औद्योगिक पट्टा आणि पश्चिमेकडील रहिवासी वस्ती यांना जोडणारा पादचारी भुयारी मार्ग रेल्वे मार्गाखालून काढण्यात आला आहे. तुर्भे रेल्वे स्थानकालगत पादचारी भुयारी मार्ग आहे. तुर्भे स्टोअर, इंदिरानगर, तुर्भे नाका, हनुमान नगर, गणपती पाडा या परिसरातील रहिवाशी तुर्भे कॉलनी, एपीएमसी, वाशी या परिसरात कामानिमित्त ये-जा करण्यासाठी या भुयारी मार्गाचा वापर करतात. सध्या या मार्गाची देखभाल, दुरुस्ती आणि स्वच्छता सिडकोकडे आहे. मात्र, दुर्दैवाने सिडको प्रशासनाचे तुर्भे रेल्वे स्थानकातील भुयारी पादचारी मार्गाकडे दुर्लक्ष होत आहे.  या मार्गातील पायऱ्या ठिक-ठिकाणी तुटलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना चढ-उतार करताना पाय घसरुन इजा होत आहे. तसेच तुर्भे रेल्वे स्थानकातील भुयारी पादचारी मार्ग रात्रंदिवस खुला असल्याने रात्री या ठिकाणी गर्गुल्यांचा देखील वावर असतो. रात्री गर्दुले अनेकदा या मार्गामध्ये लघुशंका करणे, नशा करुन दारुच्या बाटल्या तेथेच टाकून देणे तसेच अन्य प्रकार करत आहेत. या मार्गाच्या  मध्यभागी मलनिःसारण वाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे शौच मिश्रित पाणी या मार्गात जमा होत आहे. परिणामी प्रवाशांना  नाक मुठीत धरुन या मार्गातून प्रवास करावा लागत आहे. याशिवाय या मार्गातील काही ट्यूबलाईट बंद पडल्याने रात्री अंधार देखील पसरत आहे. या भुयारी पादचारी मार्गात मद्य प्राशन करुन मद्यपी फिरत असतात. त्यामुळे  महिलांना येथून ये - जा करण्यास असुरक्षितता वाटत आहे. या भुयारी पादचारी मार्ग मध्ये दैनंदिन पाणी वाहून नेणारे गटर तुंबले आहे. या मार्गाला लागून पूर्व आणि पश्चिम दिशेला सुलभ शौचालय आहे. मात्र, या दोन्हीही शौचालयांची योग्य प्रकारे निगा राखली जात नाही. त्यामुळे भुयारी मार्गातून बाहेर पडताच शौचालयातील दुर्गंधीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ‘स्वच्छ भारत अभियान' चालू आहे. त्यामुळे सिडको आणि महापालिका अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तुर्भे रेल्वे स्थानकातील भुयारी पादचारी मार्गातील अस्वच्छता दूर करुन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी या  भुयारी पादचारी मार्गातून ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर पोलीस ठाणे मध्ये दर्शनी भागात शासकीय सेवांचे फलक; आवारात फुलपाखरु बाग