भिवंडी शहरात सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेराची नजर

भिवंडी: संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.त्यासाठी ९२७ पोलिस अधिकारी कर्मचारी यांसह राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.भिवंडी पोलिस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात १७९  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणेशोत्सव साजरा करीत आहेत.तर १६३१५ खाजगी,घरगुती गणपती स्थापना होणार आहेत. गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्याकरीता सर्व पोलीस ठाणे हद्दीत गणेशोत्सव मंडळे, शांतता समिती सदस्य,पोलीस मित्र,महिला दक्षता समिती सदस्य,मोहल्ला कमिटी यांच्या बैठका घेऊन गणेशोत्सव शांततेत पार पाडणेबाबत सहकार्य करणेबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.तर भिवंडी पालिका, टोरंट पॉवर यांच्या सोबत बैठका घेऊन त्यांना सुद्धा योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.गणेशोत्सव काळात भिवंडी शहरात ३ पोलीस उपायुक्त,

सहाय्यक पोलिस आयुक्त ३,पोलिस निरीक्षक १७,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक / पोलिस उपनिरीक्षक ९३,पोलिस अंमलदार ५९०,महिला  पोलीस अंमलदार १६२,होमगार्ड ६५,राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या,आरसीपी मोबाईल झोन २ स्ट्रायकिंग एवढा बंदोबस्त नेमण्यात आला आहे.त्यासोबत गणपती विसर्जन मिरवणुक मार्गासह शहरातील  महत्वाचे ठिकाणी ८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.तर २० ड्रोण कॅमेरा द्वारे विसर्जन मिरवणुकीवर निगराणी ठेवण्यात येणार आहे.तसेच प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत समन्वय अधिकारी, पोलीस अंमलदार,शांतता समिती सदस्य, पोलीस मित्र नेमण्यात आले आहेत अशी माहिती उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बाप्पांचे आगमन खड्ड्यातून; निषेधार्थ आंदोलन