करंजा-रेवस पुल बाधित प्रकल्पग्रस्तांचे १५ ऑगस्ट रोजी बेमुदत आमरण उपोषण
उरण : २९६३. ९७ कोटी रुपये खर्चाच्या करंजा-रेवस पुलाच्या निर्माण कामात प्रकल्पबाधित शेतकरी ग्रामस्थ आणि स्थानिक मच्छीमार आदिंना मिळणारा मोबदला, भू-संपादन, नुकसान भरपाई, रोजगार, देण्यात येणारे कॉन्ट्रॅक्ट, नोकरी या सर्वांमध्ये होत असलेल्या दिरंगाईबाबत आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त, शेतकरी, ग्रामस्थ यांना विश्वासात न घेता रेवस पुलाचे काम सुरु केल्याने तसेच निष्पाप नागरिकांना, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना धमकविण्याचा प्रकार सुरु झाल्याने या अन्यायाच्या निषेधार्थ करंजा-कोंढरी गावचे प्रकल्पग्रस्त, शेतकरी, ग्रामस्थ येत्या १५ ऑगस्ट २०२५ रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत उपोषण करणार आहेत.
समुद्रकिनारी असलेल्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीत करंजा गावातून सुरु असलेल्या करंजा-रेवस पुलाच्या निर्माण कार्याला ऑक्टोबर २०२४ रोजी सुरुवात झाली. पुलाचे काम अफकॉन कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे. सदर काम शासनाच्या ‘एमएसआरडीसी'च्या माध्यमातून होत आहे. पण, काम सुरु करण्याअगोदर ‘एमएसआरडीसी'मार्फत या मार्गात बाधित होणाऱ्या जमीन मालकांना, मच्छीमारांना किंवा प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. शेतकरी, प्रकल्पग्रस्त, ग्रामस्थ यांच्या सोबत शासनाने कोणतेही चर्चा केलेली नाही. या बाबतीत शासनाने कोणतेही ठोस भूमिका घेतलेली नाही. अफकॉन कंपनीच्या अथवा ‘एमएसआरडीसी'च्या माध्यमातून शेतकऱ्यांना विश्वासात न घेता ड्रिलींग, पायलिंग, जमीन सर्वेक्षण, जमीन मोजणीचे काम सुरु आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये एमएसआरडीसी आणि अफकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. शिवाय शासकीय अधिकारी वर्गांकडून दडपशाही आणि हुकूमशाही पध्दतीचा वापर करुन अफकॉन कंपनीकडून शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची भिती दाखविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्त वर्गात संतापाची लाट पसरली आहे.
संबंधित कंपनी प्रशासन कडून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी उरण मधील शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरुन शेतकऱ्यांना फसविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सदर ग्रामस्थ, शेतकरी, प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर करंजा आणि कोंढरी गावातील ग्रामस्थ, शेतकरी, प्रकल्पग्रस्तांनी १५ ऑगस्ट रोजी म्हणजेच स्वातंत्र्य दिनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात १७ मे २०२५ रोजी चाणजे ग्रामपंचायत कार्यालयात महत्वाची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीला चाणजे ग्रामपंचायत सरपंच अजय म्हात्रे, उपसरपंच कल्पना पाटील, सागर कडू, माजी सभापती सचिन डाऊर, सामाजिक कार्यकर्ता व्यंकटेश म्हात्रे, महेश म्हात्रे, सदस्य प्रकाश पाटील, राजन घरत, प्रकाश थळी, दिनेश म्हात्रे, जगदीश ठाकूर, मेघनाथ थळी, परेश म्हात्रे, मधुकर थळी, निलेश भोईर यांच्यासह करंजा आणि कोंढरी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
अफकॉन कंपनी आणि एमएसआरडीसी करंजा आणि कोंढरी गावातील शेतकरी प्रकल्पग्रस्त, ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करीत आहेत. शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांना कोणताही मोबदला अथवा नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांना धमकविण्याचे आणि गुन्हा दाखल करण्याच्य धमक्या देण्यात येत आहेत. त्यामुळे झालेल्या अन्यायाच्या विरोधात १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे बेमुदत आमरण उपोषण करण्याचा एकमुखी निर्णय प्रकल्पग्रस्त, शेतकरी, ग्रामस्थांतर्फे घेण्यात आला आहे.
-सचिन डाऊर, सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामस्थ करंजा गाव.