तिकीट काऊंटरचे स्लॅब कोसळले; कर्मचाऱ्यांमध्ये भिती
उल्हासनगर : ‘मध्य रेल्वेे'च्या उल्हासनगर स्थानकातील पूर्वेकडील तिकीट काऊंटर वरील स्लॅब अचानक कोसळल्याने तिकीट काऊंटर वरील कर्मचारी या अपघातातून सुर्दैवाने बचावले. मात्र, घटनेनंतर डागरुजीसाठी १६ जुलै रोजी रात्री १० वाजल्यापासून ते १७ जुलै रोजीी दुपारी ४ वाजेपर्यंत पूर्वेकडील तिकीट खिडक्या बंद असल्याचे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे सकाळ पासून प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आणि त्यांना पश्चिमेकडील तिकीट खिडक्यांवर धावपळ करत जावे लागले.
‘मध्य रेल्वेे'च्या उल्हासनगर स्थानकात पूर्वेकडील भागात ३ तिकीट खिडक्या आहेत. तर पश्चिमेकडे २ तिकीट खिडक्या आहेत. १६ जुलै रोजी सायंकाळी पूर्वेकडील तिकीट खिडक्यांवर कर्मचारी तिकीट देण्याचे काम करीत असताना अचानक वरील पीओपीचा स्लॅब कोसळला. त्यामुळे कर्मचारी खूपच घाबरले आणि त्यांनी तिकीट काऊंंटरच्या बाहेर धाव घेतली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. सदर घटनेमुळे रात्री १० वाजल्यापासून पूर्वेकडील तिन्ही तिकीट खिडक्या बंद ठेवण्यात आल्या. याशिवाय सदर ठिकाणी डागडुजीच्या कामाला सुरुवात देखील करण्यात आली. सर्व रेल्वे प्रवाशांना सूचना देण्यासाठी तिकीट काऊंटर च्या बाहेर रात्रीपासूनच फलक लावण्यात आले होते. त्या फलकावर १६ जुलै रोजी रात्री १० वाजल्यापासून ते १७ जुलै रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत पूर्वेकडील सर्व ३ खिडक्या बंद राहतील, अशा सूचना प्रवाशांना देण्यात आल्या.
पण, १७ जुलै रोजी सकाळी रेल्वे प्रवाशी धावपळ करत जेव्हा त्या तिकीट काऊंंटर जवळ गेले, तेव्हा त्यांना तिनही काऊंटर बंद दिसल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. काही प्रवासी वेळेवरच रेल्वे स्थानकात येत असतात. पण, या बंद असलेल्या खिडक्या पाहून त्यांना पश्चिम कडील रेल्वे तिकीट काऊंटरकडे धाव घ्यावी लागली. सदर प्रकार दिवसभर असाच सुरू होता. त्यामुळे प्रवाशांचे खूपच हाल झाले.
उल्हासनगर रेल्वे स्थानकातील तिकीट काऊंटर परिसरात सर्वत्र दुरुस्तीची गरज असल्याचे या घटनेवरुन दिसून येत आहे. याशिवाय काही महिन्यापूर्वी दुरुस्ती देखील करण्यात आली होती. ते काम कशा पध्दतीने केले आहे, याची देखील पाहणी होणे गरजेचे आहे. १६ जुलै रोजी सायंकाळी अचानक घडलेल्या या घटनेमुळे उल्हासनगर रेल्वे स्थानकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या समस्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पाहणी करावी, अशी मागणी केली जात आहे.