‘केडीएमसी'तर्फे सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन
कल्याण : क्रीडा-युवक सेवा संचालनालय-मुंबई, जिल्हा क्रीडा परिषद-ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ६४ व्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सन २०२५-२६ सब ज्युनिअर, ज्युनिअर मुले आणि मुलींच्या स्पर्धेचे आयोजन शहाड पश्चिम येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या मैदानावर करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे आयोजन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून स्पर्धेचे उद्घाटन महापालिका क्रीडा विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर स्पर्धेत एकूण ६० संघ सहभागी झाले आहेत. १५ वर्षाखालील पहिला सामना ओमकार केंब्रिज स्कुल, डोंबिवली (पूर्व) विरुध्द ब्लॉसम स्कुल, ठाकुर्ली (पूर्व) या दोन संघामध्ये झाला. या सामन्यामध्ये ब्लॉसम स्कुल, ठाकुर्ली (पूर्व) या संघाने विजय मिळविला आहे. त्याचप्रमाणे ९ जुलै रोजी १७ वर्षाखालील मुले तर उद्या १० जुलै रोजी १७ वर्षाखालील मुलींच्या संघात सामना रंगणार आहे.
शुभारंभाच्या सामन्याप्रसंगी क्रीडा-सांस्कृतिक विभागाचे पर्यवेक्षक प्रविण कांबळे, खेळ प्रमुख विजय सिंह तसेच सहभागी शाळांचे क्रीडा शिक्षक तसेच शिक्षण आणि क्रीडा विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.