महापालिका कारभाराविरोधात ठाकरे गट रस्त्यावर

पनवेल : पनवेल महापालिकेच्या निष्क्रियतेचा आणि भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यासाठी ‘शिवसेना ठाकरे गट'ने रणसंग्राम छेडला आहे. शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली १४ ऑक्टोबर रोजी पनवेल महापालिकेवर टाळे बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी १८८-पनवेल विधानसभा मधील सर्व शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

दरम्यान, महापालिकेच्या कारभाराने त्रस्त नागरिकांच्या भावना उफाळून आल्या आहेत. अनेकदा निवेदने देऊनही काहीच हालचाल न झाल्याने अखेर शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरले. पनवेलकरांच्या हक्कासाठी आम्ही टाळे लावत आहोत. प्रशासन झोपलंय; पण जनता आता जागी झाली आहे. पनवेल महापालिकेने काम करावे, अन्यथा खुर्ची सोडावी, असा इशारा शिरीष घरत यांनी यावेळी दिला.

यावेळी शहरातील रस्ते,पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरिकांच्या मुलभूत गरजा या सर्व बाबींवर प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला. जनतेच्या पैशावर चालणारी महापालिका देखील जनतेच्या प्रश्नांकडे पाठ फिरवणारी यंत्रणा झाली आहे, आम्ही सहन करणार नाही असा घणाघात ‘शिवसेना'ने केला. पनवेलकरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारेे प्रशासन आम्हाला नकोय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनातील आक्रमकतेने महापालिका अधिकाऱ्यांची धावपळ उडाली.

याप्रसंगी शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, रामदास पाटील, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, महानगर संघटक गुरुनाथ पाटील, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर बडे, संदीप तांडेल, शहरप्रमुख प्रवीण जाधव, यतीन देशमुख, सदानंद शिर्के, रामदास गोवारी, सूर्यकांत म्हसकर, गुरु म्हात्रे, प्रदीप केणी, युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, विधानसभा अधिकारी अजय पाटील, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका रेवती सकपाळ, विधानसभा संघटिका सुजाता कदम, उपतालुका संघटिका तनुजा झुरे, उपमहानगर संघटिका रुपाली कवळे, शहर संपर्क संघटिका समीक्षा पांगम, श्रध्दा जाधव, संगीता राऊत, मालती पिंगळा, सामीना कुडाळकर, अर्चना कुळकर्णी, ज्योती मोहिते, संपदा धोंगडे यांच्यासह पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे