मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवली जलमय

कल्याण : अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर १९ ऑगस्ट पासून ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे बारवी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे कल्याण-डोंबिवली मध्ये ठिकठिकाणी खाडी आणि नदीकिनाऱ्यावरील भागामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पावसाच्या आकडेवारीचा विचार करता गेल्या २४ तासांत कल्याण डोंबिवलीत १७२.६  मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसराला १९ ऑगस्ट पासूनच पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्यातच बारवी धरणही पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या ११दरवाजांमधून तब्बल २३६ क्युसेक इतका प्रचंड वेगाने पाणी बाहेर पडत आहे. परिणामी, एकीकडे मुसळधार आणि दुसरीकडे बारवी धरणाचे पाणी उल्हास नदीद्वारे कल्याणच्या नदीकिनारी असलेल्या वालधुनी, योगीधाम, रिंगरोड अशा अनेक सखल भागात शिरले आहे. तर पुढे हेच पाणी कल्याण खाडीलाही जाऊन मिळत असल्याने दुर्गाडी गणेश घाट, रेतीबंदर परिसर जलमय झाला. त्यासोबतच शहाड मोहने, योगीधाम, गौरीपाडा सिटी पार्क, भवानी नगर, कल्याण पूर्वेतील अशोक नगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, वालधुनी परिसरातील अनेक चाळी आणि घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले.

‘केडीएमसी'चा ड्रिम प्रोजेक्ट सिटी पार्क कोट्यवधी रुपये खर्च करुन सुमारे ३५ एकर मध्ये साकरला आहे. वालधुनी नदीला लागून ‘सिटी पार्क'ला रिटनिंग वाँल बांधून देखील यंदाही पावसाच्या पुराचे पाणी ‘सिटी पार्क'मध्ये शिरल्याने बच्चे कंपनीची खेळणी, विद्युत प्रकाश योजनेला यांचा फटका बसल्याने देखभाल-दुरुस्ती प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. जाणाकारांच्या मते सिटी पार्क वालधुनी नदीलगत कांदळवन साकरत पूर परिस्थितीवर नियंत्रण आणावे.

उल्हास नदी पात्रातील पाणी ‘केडीएमसी'च्या मोहिली जलशुध्दीकरण केंद्रात शिरल्याने खबरदारीची उपाय म्हणून पहाटे ३ वाजल्यापासून पंपिंग स्टेशन बंद करण्यात आले आहे. जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी ओसरल्यानंतर पाणीपुरवठा सुरु केला जाणार आहे. परिणामी, संपूर्ण अ, ब प्रभाग क्षेत्राचा काही भाग आणि जे प्रभाग क्षेत्रातील अशोकनगर, शिवाजीनगर वालधुनी या परिसराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. तसेच काळू नदीवरील टिटवाळा जॅकवेलमध्ये पाणी आल्याने टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्र सकाळी ८.३० वाजेपासून बंद करण्यात आले आहे. मात्र, जलशुद्धीकरण केंद्रात कुठलाही बिघाड झालेला नसून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका तर्फे करण्यात आले.

तर रायते पुलावरुन पाणी वाहू लागल्याने १९ ऑगस्ट रोजी रात्रीपासून बंद असणारा कल्याण-मुरबाड मार्ग २० ऑगस्ट रोजीही बंदच आहे. त्यातच याला पर्यायी असणारा टिटवाळा-रायते मार्गही पाण्याखाली गेल्याने सदर मार्गही बंद झाल्याने अनेकांचे मोठे हाल झाल्याचे पहायला मिळाले.  उल्हास नदी काळू नदी वालधुनी नदी, या तिन्ही नद्यांना पूर आल्याने याचा फटका गावांना देखील बसला आहे. तिन्ही नद्यांचा पाणी कल्याणच्या खाडीला मिळत असल्याने आणि  समुद्राला भरती असल्याने २० ऑगस्ट रोजी खाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाडीच्या पाण्याची पातळी वाढल्याने खाडी किनारी असलेली नागरी वस्तीत पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. तसेच तबेल्यामध्ये देखील पाणी शिरल्याने हजारो म्हशींना गोविंदवाडी बायपास पुलावरील रस्त्यावर बांधण्यात आले आहे.

कल्याण ग्रामीण मध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याने अनेक गावाचे संपर्क तुटलेला आहे. कल्याण-नगर रोडच्या महामार्गाचे काम देखील सुरु आहे. त्यामध्ये रायते नदी परिसरात अडकलेले नॅशनल हायवेचे ३० कामगार पोकलेनच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती ‘कल्याण'चे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सीबीडी बेलापूर येथे ऑईल टँकर उलटला; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली