शेअर ट्रेडींगचे आमिष दाखवून फसवणूक; ७ जणांची टोळी गजाआड

नवी मुंबई : शेअर बाजारात मोठ्या नपयाचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ७ जणांच्या टोळीला नवी मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत देशभरातील ११८ बँक खाती गोठविण्यात आल्यामुळे तब्बल ३२ लाख ५० हजाराची रक्कम गोठवण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या टोळीतील ३ आरोपी टेलीग्राम ॲपद्वारे चीन आणि कंबोडिया येथील सायबर फ्रॉडस्टरच्या संपर्कात असल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे या सायबर गुन्हेगारांचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन आणि कंबोडियापर्यंत जोडले गेल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.  

सदर कारवाईत अटक करण्यात आलेल्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीने ऑवटोबर महिन्यामध्ये खारघरमध्ये राहणाऱ्या डॉक्टरला शेअर मार्केट ट्रेडींगमध्ये मोठा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवे होते. त्यानंतर या टोळीने या डॉक्टरला गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ७ लाख ८० हजार रुपये उकळले होते. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने तातडीने या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान फसवणुकीची रक्कम ज्या पहिल्या स्तरावरील चालू खात्यात वळती झाली, त्या खातेधारक सुरेश तळेकर (२९) याला पुण्यातील खराडी येथून अटक करण्यात आली.  

त्यानंतर सायबर पोलिसांनी सुरेश तळेकर याचा साथीदार विकास आव्हाड (३०) याला पुण्यातील हवेली येथून अटक केली. अधिक तपास करत पोलिसांनी विशाल व्हनमाने (२४) या आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, तो टेलीग्राम ग्रुपवरील अनोळखी आयडी धारकांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. व्हनमाने महापे येथील हॉटेलमध्ये तीन हिंदी भाषिक अनोळखी व्यक्तींना भेटल्याची आणि त्या तिघांनी त्याच्या करंट अकाऊंंटशी लिंक असलेले सिम कार्ड मागवून घेतल्याची माहिती व्हनमाने याने दिली. तसेच ते तिघे वारंवार नवी मुंबईतील हॉटेल बदलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  

त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील आणि पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नवी मुंबईतील महापे, सानपाडा, कोपरखैरणे, एपीएमसी आणि वाशी परिसरातील जवळपास ३५ ते ४० लॉज आणि हॉटेल्सची तपासणी केली. अखेरीस एपीएमसी मधील हॉटेल राधे रेसिडेंसीमध्ये पोलिसांनी छापा मारुन आणखी ५ आरोपींना अटक केली. त्यातील ३ आरोपी टेलीग्राम ॲपद्वारे चीन आणि कंबोडिया येथील सायबर फ्रॉडस्टरच्या संपर्कात असल्याचे त्यांच्या चौकशीत आढळुन आले.  

ओटीपी फॉरवर्ड करण्याचे रॅकेटः  
या टोळीतील आरोपी विविध राज्यांमधून आलेल्या करंट अकाऊंट धारकांचे सिमकार्ड स्वतःच्या मोबाईलमध्ये टाकून ओके गो एसएमएस ॲन्ड सेंडर ॲपद्वारे चालू बँक खात्याचे ट्रान्झॅक्शन (ओटीपी) चीन-कंबोडियातील सायबर फ्रॉडस्टरना फॉरवर्ड करत होते. त्यानंतर परदेशात बसलेले सायबर फ्रॉडस्टर सदर ओटीपीचा वापर करुन वेगवेगळ्या व्यक्तींची फसवणूक करुन मिळवलेली रक्कम वेगवेगळ्या खात्यात वळती करुन ती काढून घेत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर सायबर पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये देशभरातील ११८ बँक खाती गोठवून त्यातील तब्बल ३२ लाख ५० हजार रुपयांची रक्कम गोठविली.  

नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अमिषाला बळी पडू नये. टेलिग्राम, इंस्टाग्राम, व्हॉटस्‌ॲप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवण्याचे आमिष दाखवणाऱ्या जाहिरातींची खात्री करा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला किंवा पलॅटफॉर्मला आपली वैयक्तिक माहिती देऊ नका. खात्री केल्याशिवाय कोणासोबतही आर्थिक व्यवहार करु नका. जास्त नफा मिळविण्याच्या प्रलोभनाला बळी पडू नका. कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार करावी. नागरीकांनी तत्काळ तक्रार केल्यास फसवणूक झालेली त्यांची रक्कम फ्रिज करण्यात येऊन ती त्यांना परत मिळण्याची शक्यता आहे.  
- सचिन गुंजाळ, पोलीस उपायुवत (गुन्हे शाखा), नवी मुंबई. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई