सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली सत्यनिष्ठतेची शपथ
नवी मुंबई : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त सिडको भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी कर्मचारी आणि अधिकारी यांना सत्यनिष्ठतेची शपथ दिली. या प्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, डॉ. राजा दयानिधी, गणेश देशमुख, पोलीस उपमहानिरीक्षक तथा मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, व्यवस्थापक (कार्मिक) विनू नायर, सिडको एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष सुभाष पाटील यांसह सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना विजय सिंघल यांनी दक्षता सप्ताह ही औपचारिकता न राहता दैनंदिन कामकाज पार पाडताना देखील कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून पारदर्शकता जोपासायला हवी असे आवाहन केले. सुरेश मेंगडे यांनी सिडको प्रशासनामधील पारदर्शकता अधिक वाढीस लागावी याकरिता दक्षता विभागातर्फे सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
या प्रसंगी राज्यपाल, महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांनी दक्षता सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशांचे वाचन शान्तनु गोयल यांनी केले. त्यानंतर अपर पोलीस उप-आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई अनिल घेरडीकर यांनी “लाचलुचपत प्रतिबंध” या विषयावर व्याख्यान दिले.
केंद्रीय दक्षता आयोगातर्फे भ्रष्टाचारविरोधी जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशांनुसार देशभरातील शासकीय व निमशासकीय संस्था आणि कार्यालयांमध्येही या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. अधिकारी व कर्मचारी वर्ग, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी; समाजाच्या अशा विविध स्तरांतील घटकांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जागृती निर्माण होऊन भ्रष्टाचाराचे निर्मूलन व्हावे, या उद्देशाने दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. “दक्षता : आमची सामायिक जबाबदारी” ही या वर्षीच्या दक्षता जनजागृती सप्ताहाची संकल्पना आहे.
दरवर्षीप्रमाणे सिडको महामंडळामध्ये 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त सिडकोतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी “दक्षता : आमची सामायिक जबाबदारी” या विषयावर आधारित निबंध व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सप्ताहाच्या जनजागृतिसाठी प्रभात फेरी, के. के. वरखेडकर यांचे “कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्टिंग : सिलेक्शन ऑफ इक्विटेबल कंडिशन्स ॲण्ड इनकॉर्पोरेशन ऑफ सीव्हीसी गाईडलाईन्स टू एन्श्युअर फेअरनेस विथ ट्रान्सपरन्सी” या विषयावर व्याख्यान, सुशील गुप्ता यांचे “डिस्प्युट रेझोल्युशन बाय वे ऑफ रिकन्साइलेशन ॲण्ड आरब्रिट्रेशन विथ ट्रान्सपरन्सी” या विषयावरील व्याख्यानदेखील आयोजित करण्यात आले आहे.