कचरावेचक महिलांना ‘फार्मासिटीकल असोसिएशन'कडून मदतीचा हात
नवी मुंबई : नवी मुंबईतील ५ झोपडपट्टीतील घराघरांतून कचरा गोळा करुन त्याचे कंपोस्ट खतात रुपांतर करणाऱ्या २५0 कचरावेचक महिलांना ‘इंडियन फार्मासिटीकल असोसिएशन'ने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेनकोट आणि ग्लोव्हजचे वाटप करुन त्यांचे आरोग्य जपण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. कचरावेचक महिलांसाठी मदतीचा ओघ केवळ सुरुवात असून सदरचा उपक्रम सातत्याने सुरुच राहील, असे आश्वासन ‘इंडियन फार्मासिटीकल असोसिएशन'चे प्रमुख सतीश शहा यांनी यावेळी दिले.
‘स्त्री मुवती संघटना'च्या परिसर विकासमधील कचरा वेचक महिला नवी मुंबई महापालिकेच्या सहकाऱ्याने ‘एन्थोनी ग्रुप'च्या माध्यमातून दिघा ते बेलापूर येथील गांवठाण भागातील कचरा व्यवस्थापनाचे काम करीत आहेत. कचऱ्याची गाडी ज्या भागात जात नाही, त्या भागातील घरोघरी या महिला जाऊन कचरा गोळा करुन आणतात. नवी मुंबईतील ५ झोपडपट्टी भागात ५० महिला घरोघरी जाऊन कचरा घेऊन त्याचे खत बनवत आहेत. अशा २५० महिलांना रेनकोट आणि हँडग्लोवचे वाटप ‘फार्मासिटीकल असोसिएशन'ने केले.
सदर कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सुनील जैन, विजय घाडगे, संदीप देशमुख, ‘प्रभात ट्रस्ट'चे डॉ. प्रशांत थोरात उपस्थित होते. डॉ. प्रशांत थोरात यांनी ‘इंडियन फार्मासिटीकल असोसिएशन' रेनकोट आणि ग्लोव्हज देऊन पावसाळ्याच्या तोंडाशी या महिलांच्या आरोग्याचे संरक्षण करत असल्याचे सांगितले. ‘अन्वय व्यसनमुवती'चे कार्यकर्ते जीवन निकम आणि प्राध्यापिका वैशाली निकम यांनी आपले वडील जनार्दन निकम यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करुन वडिलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. प्रशांत थोरात यांनी जनार्दन निकम यांची शैक्षणिक साहित्य, वह्या आणि कंपास यांनी तुला केली. सदर शैक्षणिक साहित्य ‘स्त्री मुवती संघटना'च्या ८ झोपडपट्टीतून चालू असलेल्या अभ्यासवर्गातील ३९० मुलांना देण्यात आले.
यावेळी ‘स्त्री मुवती संघटना'च्या विश्वस्त वृषाली मगदूम यांनी नवी मुंबई महापालिकेच्या सहकार्याने आणि ‘एन्थोनी ग्रुप'च्या माध्यमातून कचरावेचक महिलांच्या हाताला काम मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. तसेच कचरा वेचक महिलांना रेनकोट आणि हँडग्लोजच्या माध्यमातून मोठी मदत मिळाल्याचे तसेच शिक्षणाच्या प्रवाहात कचरावेचकांची मुले येण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांना निकम परिवाराने शैक्षणिक साहित्य देऊन मदतीचा हातभार लावल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमास बेलापूर ते दिघा परिसरातील कचरावेचक महिला, ‘स्त्री मुवती संघटना'चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.