कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी दोन-अडीच लाखांची डिमांड?

कार्मिक विभागातील अधिकारी-कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात

नवी मुंबई : ‘सिडको'तील मलईदार विभागात बदलीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी दोन ते अडीच लाख रुपयांची मागणी केली जात असल्याचा मेसेज ‘सिडको'तील अधिकारी-कर्मचारी यांच्या व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर वायरल झाल्यामुळे ‘सिडको'तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या वादात सापडल्या आहेत. दरम्यान, या वायरल मेसेजमध्ये पैसे घेणाऱ्या अथवा देणाऱ्या व्यक्तीचे नाव नसले तरी देखील या मेसेजची व्यवस्थापनाने दखल घेतली असून चौकशी केली जात असल्याचे ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक -१ राजा दयानिधी यांनी सांगितले.  

त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही मेसेजला कर्मचाऱ्यांनी बळी न पडता ज्या कर्मचाऱ्यांकडे अशा प्रकारची डिमांड कोणी केली असेल तर त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन दयानिधी यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी नवी मुंबई महापालिकेतील १२ कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आलेल्या पदोन्नतीत पैसे घेतल्याचा आरोप प्रशासनावर करण्यात आला होता. सदर आरोपाची चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कनिष्ठ अभियंत्यांच्या पदोन्नतीला स्थगिती देत अतिरिक्त 7आयुक्त सुनिल पवार यांची या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत केली होती.  

एकीकडे नवी मुंबई महापालिकेत कनिष्ठ अभियंत्यांच्या पदोन्नतीत पैसे घेतल्याचा मेसेज सोशल मिडीयावर वायरल झाल्यानंतर आता ‘सिडको'तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये देखील पैशांची डिमांड केली जात असल्याचा मेसेज वायरल झाला आहे. विशेष म्हणजे साडेबारा टक्के योजना विभागात काम करणाऱ्या कार्यालयीन सहाय्यकाद्वारे कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे फोन करुन पैशांची डिमांड केली जात असल्याचा मेसेज सिडको अधिकारी-कर्मचारी यांच्या व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर फिरु लागल्याने सिडको वर्तुळात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या चर्चेचा विषय झाला आहे.  

दरम्यान, या वायरल मेसेजबाबत ‘सिडको'चे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्याकडे देखील काही कर्मचाऱ्यांनी तक्रार नमूद केली आहे. त्यामुळे दक्षता विभागाकडून देखील या वायरल मेसेज प्रकरणी चौकशी सुरु झाली आहे. मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी देखील याबाबत तपास सुरु असल्याचे नमूद केले. तसेच सदर वायरल मेसेजची गंभीर दखल सिडको व्यवस्थापनाने घेतली असल्याचे सह-व्यवस्थापकीय संचालक राजा दयानिधी यांनी सांगितले. असे प्रकार खपवून घेतले जाणार नसून अधिकारी-कर्मचारी यांच्या बदल्या अथवा पदोन्नती या पारदर्शक आणि नियमानुसारच केल्या जातील. त्याकरिता कोणीही पैशांची डिमांड करत असल्यास त्याबाबत तत्काळ व्यवस्थापनाला संपर्क साधण्याचे आवाहन राजा दयानिधी यांनी केले आहे.  

मलईदार खाती मिळण्यासाठी चढाओढ...
‘सिडको'तील इस्टेट विभागासह साडेबारा टक्के योजना विभाग, साडेबावीस टक्के योजना विभाग (भूसंपादन), अतिक्रमण नियंत्रण विभागात (सीयूसी) आपली नेमणूक व्हावी म्हणून अधिकारी-कर्मचारीवर्गामध्ये नेहमीच चढाओढ लागलेली असते. सदर विभाग ‘सिडको'तील मलईदार विभाग म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या विभागात नेमणूक होण्यासाठी अधिकारी-कर्मचारी यांची पैसे मोजण्याची देखील तयारी असते. परिणामी, बदली आणि पदोन्नती संदर्भात कार्मिक विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून याच गोष्टीचा फायदा घेतला जात असल्याची चर्चा ‘सिडको'त रंगली आहे.  

२ वर्षापूर्वी सहाय्यक कार्मिक अधिकारी सागर तपाडिया याने २८ बोगस कर्मचाऱ्यांच्या नावे पगार काढून ‘सिडको'चे सुमारे २ कोटीचे नुकसान केले होते. या प्रकरणी तपाडिया विरोधात गुन्हा दाखल होऊन त्याला ‘सिडको'तून बडतर्फ देखील करण्यात आले आहे. त्यावेळेस देखील ‘सिडको'चा कार्मिक विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई पोलीस एक पाऊल पुढे