महापालिका आरोग्य विभागाचा बेफिकिरीपणा
भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या आरोग्य विभागावर वरिष्ठांचे नियंत्रण ढासळल्याने या विभागात काम करणाऱ्या आरोग्य विभागाचा बेफिकिरीपणा वाढला आहे. कचरा ठेकेदाराचा ठेका संपुष्टात आल्यानंतर देखील ठेकेदारास महापालिकेने दिलेली वाहने अधिकाऱ्यांनी परत घेतलेली नाही. परिणामी, दिलेल्या वाहनांपैकी एक वाहन सार्वजनिक रस्त्यावर जाळून खाक झाले आहे. त्याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले असून याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार न केल्याने शहरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भिवंडी महापालिकेने शहरातील नागरिकांकडून ओला आणि सुका कचरा उचलण्यासाठी आणि त्या कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंंडवर विघटन करुन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठेका आर अँड बी इन्फ्रा या कंपनीस देण्यात आला होता. त्यासाठी पंतप्रधान स्वच्छता अभियान अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून महापालिकेला मिळालेली ५० इंजिन वाहने, २३ आरसी मशीन, डंपर, ट्रक आदि वस्तुही महापालिकाकडून कंत्राटदार कंपनीला दरमहा फक्त १ रुपयांना देण्यात आला होता. सदर कचरा संकलनाचा करार रद्द करुन सुमारे १० महिने उलटूनही महापालिकेच्या आरोग्य विभागाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून महापालिकेची वाहने परत घेतली नाही. अथवा ठेकेदारावर कोणतीही कारवाई केलेली नाही. याबाबत महापालिकेचे अधिकारी स्पष्टपणे कोणतीही माहिती न देता आपले फोन बंद करीत आहेत.
महापालिका सूत्रांकडून मिळालेल्या माहितनुसार महापालिकेत सध्या नागरिकांना प्रशासकीय कारभार सुरु आहे असे दिसत असले तरी पडद्यामागे राजकीय हस्तकांची आणि माजी नगरसेवकांची नगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मेहेरनजर आहे. काही अधिकारी तर माजी नगरसेवकांच्या मर्जीनेच काम करतात असे आढळून येत आहे. अशा कारभारामुळे ठेकेदाराकडे महापालिकेची वाहने बेवारस स्थितीत खाजगी आणि सार्वजनिक जागेत ठेवलेली आढळून येत आहेत. त्यापैकी ओला आणि सुका कचरा जमा करणारी घंटागाडी वाहन (क्र. एम एच ०४/ के एफ ४२०४) नागरिकांना मिल्लत नगर भागात जळत्या स्थितीत आढळून आली. याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माहिती देऊनही त्यांनी कोणतीही फौजदारी कारवाई करण्याचे धाडस केले नाही. सदर घटनेची महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी गंभीर दाखल घेऊन महापालिकेचा आरोग्य विभाग सध्या कोणाच्या दहशतीखाली काम करीत आहे, याची शहानिशा करावी. नंतर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शहरातील कर भरणारे नागरिक करीत आहेत.
भिवंडी महापालिकेने दिलेल्या ठेकेदाराकडून काही मोठ्या गाड्या वाहन विभागाने ताब्यात घेतल्या आहेत. याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरु आहे. तसेच लवकरच कारवाई करण्यात येईल.
- विक्रम दराडे, उपायुक्त(आरोग्य), भिवंडी महापालिका.