तुर्भे येथील पदपथावर एपीएमसी बाजारातील व्यापाऱ्यांचा अनधिकृत व्यापार
तुर्भे ः तुर्भे - वाशी येथील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मार्केट लगतच्या नवी मुंबई महापालिकेच्या पदपथावर एपीएमसी मार्केट मधील खोका व्यापाऱ्यांनी अनधिकृत व्यापार चालू केला आहे. विशेष म्हणजे कोणतीही सुरक्षेची उपाययोजना याठिकाणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे आगीची दुर्घटना घडून गेल्यावर महापालिका प्रशासनाला जाग येणार का?, असा प्रश्न स्थानिक नागरिकांद्वारे उपस्थित केला जात आहे. एपीएमसी मार्केट लगतच्या पदपथावरील खोका व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
तुर्भे येथील एपीएमसी फळ मार्केटमध्ये मागील महिन्यापासून आंबा हंगाम जोर धरु लागला आहे. राज्यातून आणि परराज्यातून एक लाख पेक्षा अधिक आंब्याच्या पेट्यांची आवक दररोज एपीएमसी फळ मार्केटमध्ये होत आहे. यातील बऱ्याचशा पेट्या खाली करुन त्यांची कागदी पेट्या किंवा प्लास्टिक क्रेटमध्ये विक्री केली जाते. त्यामुळे या लाकडी पेट्या पुन्हा बागायतदारांकडे पाठवल्या जातात. त्यासाठी एपीएमसीकडून लाकडी पेट्या खरेदी-विक्री करणाऱ्यांना परवाने देण्यात आले आहेत. त्यानुसार पेटी व्यापारी आंबा व्यापाऱ्यांकडून लाकडी पेट्यांची खरेदी करुन त्यांची पुन्हा बागायतदारांना विक्री करतात. यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. यापूर्वी लाकडी पेट्यांची खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय एपीएमसी फळ मार्केट मधील एन विंग आणि त्या लगतच्या मोकळ्या जागेमध्ये केला जात होता. परंतु, मागील वर्षी या ठिकाणी लागलेल्या आगीमुळे खोका व्यावसायिकांना एपीएमसी मार्केट आवारात लाकडी पेट्यांची खरेदी-विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर २० पेक्षा अधिक खोका व्यावसायिकांनी तुर्भे येथील एपीएमसी फळ मार्केट ते भाजी मार्केट पर्यंतच्या पदपथावर आंब्याच्या पॅकिंगसाठी लागणाऱ्या लाकडी पेट्यांची विक्री करण्याचा व्यवसाय चालू केला होता. मागील वर्षी याबाबत वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रसिध्द झाल्यावर नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विरोधी विभाग तर्फे लाकडी पेट्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, यावर्षी लाकडी पेट्यांची खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय चालू होऊन महिना उलटला तरी महापालिका अतिक्रमण विरोधी विभागाने याकडे डोळेझाक केल्याचे चित्र दिसत आहे. या ठिकाणी आगीपासून सुरक्षा विषयी कोणतीही उपायोजना न करता आग प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करत राजरोसपणे लाकडी पेट्यांची खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय चालू आहे. यामुळे लाकडी पेट्यांची खरेदी-विक्री करण्याच्या ठिकाणी दुर्दैवाने आगीची घटना घडल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी संबंधित बेकायदेशीर व्यावसायावर कारवाई करण्यात, यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.