वाहतूक नियमांचे उल्लंघन; २१४२ बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई    

नवी मुंबई : बेजबाबदारपणे रिक्षा चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात नवी मुंबई वाहतुक पोलीस विभागाने १ ते २३ मे दरम्यान विशेष मोहीम राबवून वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल २१४२ रिक्षा चालकांवर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये बेशिस्त रिक्षाचालकांकडून ३ लाख ३ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकाचे धाबे दणाणले आहेत.

नवी मुंबई क्षेत्रात असलेले काही रिक्षा चालक वाहतुकीचे नियम न पाळता बेजबाबदारपणे रिक्षा चालवत असल्याचे वाहतुक नियंत्रण विभागाच्या निदर्शनास आले होते. तसेच अनेक प्रवाशांनी बेजबाबदारपणे रिक्षा चालविणाऱ्या चालकांच्या विरोधात तक्रारी केली होती. प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेऊन नवी मुंबई पोलीस उपआयुक्त (वाहतुक विभाग) तिरुपती काकडे, सहाय्यक पोलीस आयुक्त वि्ील कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई वाहतुक नियेत्रण पोलीस विभागाने बेशिस्तपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात १ ते २३ मे या कालावधीत संपुर्ण नवी मुंबई पोलीस आयुवतालय हद्दीत विशेष मोहीम राबविली. या विशेष मोहीम दरम्यान नवी मुंबई वाहतुक पोलिसांच्या १६ शाखांनी आपापल्या हद्दीत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण २१४२ रिक्षा चालकांवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत भाडे नाकारणाऱ्या ८५७ रिक्षा चालकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ४८,१०० रुपये तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुक करणाऱ्या १२८५ रिक्षा चालकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ५५,२०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.  

दरम्यान, रिक्षा चालक-मालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन नवी मुंबई मधील वाहतुक सुरळीत ठेवण्यास नवी मुंबई वाहतुक पोलीस विभागास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी केले आहे.

नवी मुंबई पोलीस आयुवतालय हद्दीतील बेशिस्त रिक्षा चालकांवर यापुढील काळात देखील दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरुच राहणार आहे. - तिरुपती काकडे, पोलीस उपआयुक्त (वाहतुक विभाग) - नवी मुंबई पोलीस आयुवतालय. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नेरुळ-बेलापूर-उरण मार्गावरील लोकल फेरीमध्ये १ तासाचे अंतर