पनवेल महापालिका, खारघर टाटा हॉस्पिटल यांच्यामध्ये करार

पनवेल : आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीटीआरईसी खारघर, टाटा हॉस्पिटल खारघर आणि पनवेल महापालिका यांच्यामध्ये कर्करोग प्रशिक्षण आणि कर्करोग तपासणी याकरिता करारनामा करण्यात आला. पनवेल महापालिकेचा सदर अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पाकरिता आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त प्रसेनजित काकारलेकर यांच्या सूचनेप्रमाणे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी आणि टाटा हॉस्पिटल खारघरचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांच्या सहीने सदर करारनामा करण्यात आला आहे.

पनवेल महापालिका, डॉ. नानासाहेब धम्रााधिकारी उपजिल्हा रुग्णालय पनवेल आणि दोस्त मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अंगदान जीवन संजीवनी अभियान' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत अवयवदान पंधरवडा साजरा केला जातो आहे, या अंतर्गत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, टाटा हॉस्पिटल परेलच्या विभागप्रमुख डॉ. शर्मिला पिंगळे,  टाटा हॉस्पिटल खारघरचे संचालक राजेश दिक्षीत, उपसंचालक डॉ. गौरवी मिश्रा, डॉ. सुरेंद्र माथुर, डॉ. वत्सला त्रिवेदी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक गीते, महापालिका वैद्यकीय अधिकारी, आदि उपस्थित होते.

यावेळी आ. प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. पनवेल महापालिकेने घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना या उपक्रमामुळे अत्यंत लाभ होणार आहे. तसेच कर्करोगाचे निदान सुरुवातीच्या स्टेजमध्येच होण्यासाठी मदत होणार असून या उपक्रमामुळे कर्करोगाचे प्रमाण आणि कर्करोगामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्येमध्ये घट होईल, असा विश्वास व्यक्त केला.

पनवेल महापालिकेच्या सर्व २६ नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टाटा हॉस्पिटल खारघर मार्फत कर्करोग तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणी कर्मचारी यांना कर्करोग तपासणी करिता प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

याप्रसंगी बोलताना उपायुक्त प्रसंगीत कार्लेकर यांनी सदर उपक्रमाविषयी उपस्थितांना माहिती दिली. टाटा हॉस्पिटल खारघर येथील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग तपासणी आणि कर्करोग प्रशिक्षण असे दोन्ही कार्यक्रम पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये सुरु करण्यात आले आहेत. याकरिता टाटा हॉस्पिटलच्या डॉ. शर्मिला पिंगळे (विभागप्रमुख, प्रिव्हेंटिव्ह ओन्कोलॉजी) यांनी देखील कर्करोगाबद्दल माहिती दिली.

या कार्यक्रमात डॉ. दोस्त फाऊंडेशनचे डॉ. कैलाश जवादे आणि त्यांच्या टीम कडून अवयवदानाविषयी सादरीकरण करण्यात आले.यावेळी स्नेहल हांडे, उर्मिला महाजन यांनी अवयव दानाविषयीची माहिती दिली.

नागरिकांना तात्काळ आणि दर्जेदार आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी यावेळी अत्याधुनिक ३ रुग्णवाहिकेचे लोकार्पण आ.  प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंगदान जीवन संजीवनी अभियान अंतर्गत आ. प्रशांत ठाकूर यांनी अवयव दानाचे महत्व विषद करुन सांगितले. मृत्युमुखी पडल्यानंतरही आपण आपले अवयव दान करुन जिवंत राहू शकतो, असे सांगत त्यांनी स्वतः आणि त्यांच्या पत्नीने अवयव दानाचा साठीचा अर्ज भरले असल्याचे नमूद केले. मृत्युनंतर आपण डोळे, यकृत, त्वचा अशा विविध अंगाचे दान करुन इतरांना जीवनदान देऊ शकतो, असे ते म्हणाले.  

महापालिका कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या नवीन रुग्णवाहिका प्राथमिक जीवनरक्षक सुविधांनी सुसज्ज असून, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.
- मंगेश चितळे, आयुक्त-पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गोवर्धनी माता मंदिराचा १८ वा जीर्णोध्दार सोहळा थाटामाटात संपन्न