महापालिका हद्दीतील रस्त्यांची दुरुस्ती, ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी

खारघर : पनवेल महापालिका हद्दीतील ग्रामीण आणि शहरी भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, असे निदर्शनास आणून, ‘पनवेल महापालिका हद्दीतील ग्रामीण आणि शहरी भागात रस्त्यांचे काम करणाऱ्या  ठेकेदारांवर कारवाई करण्याची तसेच रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांची तात्काळ दुरुस्ती करण्याची' मागणी शिवसेना (उबाठा) तर्फे पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणीची तड लावण्यासाठी शिवसेना (उबाठा) रायगड जिल्हाप्रमुख  शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

श्रीगणेशउत्सव आता २० दिवसांवर येवून ठेपला आहे. पनवेल महापालिका हद्दीतील ग्रामीण आणि शहरी भागातील रस्त्यांची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. महापालिका प्रशासनाकडे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत पत्रव्यवहार करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे शिवसेना तर्फे पनवेल महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात जाण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा रक्षक आणि पोलिसांकडून त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु,  शिवसैनिकांनी रौद्र रुप धारण करत शिवसेना स्टाइलने बॅरिगेट्‌स तोडत महापालिका मुख्यालयात शिरकाव केला. दरम्यान, यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी  महापालिका आयुक्त  मंगेश चितळे यांची भेट घेऊन त्यांना रस्त्यांची नित्कृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या भ्रष्ट कंत्राटदारांवर कारवाई करण्याच्या मागणी करणारे निवेदन दिले. यावेळी महापालिका आयुक्तांनी येत्या श्रीगणेश उत्सवापूर्वी महापालिका हद्दीतील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले.

शिवसेना तर्फे पनवेल महापालिका मुख्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाचे आयोजन शिवसेना पनवेल महानगर प्रमुख अवचित राऊत यांनी केले होते. या मोर्चात शिवसेना विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, महानगर समन्वयक दिपक घरत, संघटक गुरुनाथ पाटील, पनवेल तालुका प्रमुख संदीप तांडेल, उपमहानगर प्रमुख प्रकाश गायकवाड, युवासेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते, शहर प्रमुख प्रवीण जाधव, सदानंद शिर्के, प्रदीप केणी, गुरु म्हात्रे, रामदास गोवारी, सूर्यकांत म्हसकर, यतीन देशमुख, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुस्सादीप मोडक, महिला आघाडी पदाधिकारी प्रेमा अप्पाचा, रुपाली कवळे,  अर्चना कुळकर्णी, संपदा धोंगडे, उज्वला गावडे,  सानिका मोरे, श्रध्दा कदम, ज्योती मोहिते, समीक्षा पांगम, युवा सेना प्रभारी विधानसभा अधिकारी अजय पाटील, महानगर अधिकारी महेश भिसे, महानगर चिटणीस जीवन पाटील, पनवेल शहर अधिकारी निखिल भगत, नवीन पनवेल शहर अधिकारी जितेंद्र सिध्दू, खारघर शहर अधिकारी निखिल पानमंद, खांदा कॉलनी शहर अधिकारी आबेश ओंबळे, पनवेल शहर चिटणीस साई सुरज पवार यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिवपदी श्रुती म्हात्रे यांची निवड