नेरुळ येथील सुश्रुषा हॉस्पिटलमधील बेसमेंटमध्ये भीषण आग

नवी मुंबई : नेरुळ सेक्टर-6 मधील सुश्रुषा हॉस्पिटल मधील बेसमेंटमध्ये सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन येथील आग आटोक्यात आणण्याबरोबर रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या 21 रुग्णांना रुग्णालयातील कर्मचाऱयांच्या मदतीने तत्काळ बाहेर काढुन त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले.    

सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास नेरुळ सेक्टर-6 मधील सुश्रुषा हॉस्पीटलमधील बेसमेंटमध्ये आग लागली. यावेळी रुग्णालयातील आयसीयूमध्ये 4 तर इतर वार्डमध्ये 17 रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच रुग्णालयातील 42 कर्मचारी उपस्थित होते. आगीमुळे रुग्णालयाच्या बेसमेंटमधुन मोठ्या प्रमाणात धूर वरच्या मजल्यांवर पसरल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱयांनी तत्परता दाखवत रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.  

या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या नेरुळ आणि वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनी चार गाड्या सह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याबरोबरच बचावकार्य राबवून रुग्णालयात अडकुन पडलेल्या काही रुग्णांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. त्यांनतर या रुग्णांना दुसऱया रुग्णालयात हलवण्यात आले. या रुग्णालयातील सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी बेसमेंटमधील एसी यंत्रणेत शॉर्ट सर्कीट होऊन सदरची आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरु