वाहतूक नियमांचे उल्लंघन; २६५ वाहन चालकांवर कारवाई
नवी मुंबई : वाशी वाहतूक शाखेने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २६५ वाहन चालकांविरोधात ११ दिवसांमध्ये विशेष मोहीम राबवून त्यांच्याकडून तब्बल ३.४३ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे, नो-पार्किंगमध्ये गाड्या उभे करणारे, स्टँटबाजी करणारे तसेच प्रलंबित चलन असणाऱ्यांवर सदर कारवाई करण्यात आली.
वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या सुचनेनुसार वाशी वाहतूक शाखेच्या वतीने १ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत सदर मोहीम राबविण्यात आली. या काळात एकूण २६५ वाहनचालकांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल ३ लाख ४३ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या ४ जणांवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे २७९ प्रकरणे न्यायालयात दाखल केली गेली असून २३ वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, युट्यूबवर प्रसिध्दी मिळविण्यासाठी धोकादायक स्टंट करणाऱ्या युट्यूबरवर देखील प्रचलित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्यावर न्यायालयीन कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्याशिवाय वाशी वाहतूक शाखेच्या वतीने परिसरातील गर्दीची ठिकाणे, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच तरुणांनी सोशल मीडियासाठी स्टंट करु नयेत, याबाबत प्रबोधन करण्यात आले.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधातली सदर कारवाई सातत्याने सुरु राहणार असून नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत करावी. तसेच नागरिकांनी १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘राष्ट्रीय लोकअदालत'ला त्यांच्या वाहनांवरील प्रलंबित असलेला दंड तत्काळ भरावा, असे आवाहन वाशी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांनी केले आहे.