ठाणे मध्ये आयोजित ना. गणेश नाईक यांच्या जनता दरबारास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
३४५ पेक्षा अधिक नागरिकांची तक्रार
ठाणे : राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ११ एप्रिल रोजी ठाणे शहरातील मानपाडा येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित जनता दरबारात ३४५ पेक्षा जास्त नागरिकांनी विविध समस्यांची निवेदने सादर करुन समस्यांचा पावसाळ्यापूर्वीच पाऊस पाडला.
या जनता दरबारात ना. गणेश नाईक यांनी शक्य असलेल्या निवेदनांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अथवा प्रत्यक्ष सूचना देऊन दिले. उर्वरित निवेदनांवर निश्चित कालमर्यादेत कार्यवाही केली जाईल आणि त्याबाबत पुढील जनता दरबारात अर्जदारांना माहिती दिली जाईल, असे ना. गणेश नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.
या जनता दरबारात माजी खासदार डॉ. संजीव नाईक, संजय वाघुले, आमदार निरंजन डावखरे, मनोहर डुंबरे, नारायण पवार यांच्यासह विविध शासकीय आणि निमशासकीय विभागांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ना. गणेश नाईक यांच्या जनता दरबारात नागरिकांनी विशेषतः पाणीटंचाई, रस्ता रुंदीकरणामुळे झालेले अन्याय आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमधील गैरव्यवहार यांसारख्या समस्यांवर भर दिला. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मूळ झोपडीधारकांच्या नावाऐवजी इतरांची नावे समाविष्ट केल्याची तक्रार झोपडीधारकांनी केली. रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या अनेक नागरिकांना अद्याप घरे आणि दुकाने न मिळाल्याची व्यथा मांडली. विविध भागांतील पाणी टंचाईमुळे त्रस्त नागरिकांनी सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी निवेदने सादर केली. या निवेदनांची दखल घेऊन, रस्ता रुंदीकरण बाधितांना लवकरात लवकर न्याय देण्याचे तसेच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश ना. गणेश नाईक यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला दिले.
सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनी बळकावल्याच्या प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेशही ना. गणेश नाईक यांनी यावेळी दिले. ज्या प्रवृत्तींनी सर्वसामान्यांच्या जीवनात दुःख निर्माण केले आहे, त्यांनी आपली चूक सुधारावी, असा स्पष्ट सल्लाही ना. गणेश नाईक यांनी दिला.
‘लोकांच्या समस्या अनेकदा स्थानिक पातळीवर सुटत नसल्याने त्यांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण होऊन त्यांची निराशा दूर व्हावी, हाच जनता दरबार घेण्यामागचा उद्देश आहे. जनता दरबारात आलेल्या प्रत्येक प्रकरणाला शंभर टक्के न्याय मिळवून देण्यासाठी आपले निश्चित प्रयत्न राहतील. आतापर्यंत झालेल्या जनता दरबारातील तक्रारींपैकी जवळपास ६० टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात प्रशासनाला यश आले आहे. नागरिक आनंदाने पुष्पगुच्छ किंवा शाल घेऊन येतात, पण आपण इथे केवळ लोकसेवेच्या भावनेतून आलो आहे', असे याप्रसंगी ना. गणेश नाईक यांनी नमूद केले.
‘निश्चितच, लोकांना दिलासा देण्यासाठी जनता दरबार एक उत्तम माध्यम आहे. महापालिका क्षेत्रात पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि कंत्राटी सेवांसारखी अनेक आव्हाने आहेत. घनकचरा व्यवस्थापनात महापालिका आयुक्तांना काही अडचण असल्यास निश्चितपणे मदत केली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातील जनता माझीच आहे. एकेकाळी आपण १५ वर्षे ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि आता संपर्कमंत्री म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील किंवा भारतातील कोणतीही जनता असो, ती माझीच आहे. जनतेच्या समस्या आणि व्यथा ऐकून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणे माझे कर्तव्य आहे', असे मनोगत यावेळी ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केले.
‘सागरी किनाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याने कांदळवन तोडण्याचे प्रमाण वाढले आहे. जर कोणी कांदळवनात अतिक्रमण केले, तर त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई केली जाणार आहे. गरज पडल्यास अनधिकृत बांधकामे पाडली जातील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. गरीब नागरिकांनी बांधलेल्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन दुसऱ्या ठिकाणी केले जाणार आहे. मुंबई मधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १५० लाखांच्या वस्तीतील मूळच्या ४२ आदिवासी वाड्या-पाड्यांमधील लोकांचे पुनर्वसन म्हाडा मार्फत राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर उत्तन आणि ठाणे येथे केले जाणार आहे. नियमांचे उल्लंघन होईल, असे कोणतेही काम केले जाणार नाही. सध्या वर्सोवा ते नालासोपारा येथे पूल आणि रस्त्यांची कामे सुरु आहेत'. - ना. गणेश नाईक, वनमंत्री - महाराष्ट्र राज्य.