महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
नैना क्षेत्रातील नगररचना परियोजना ८, ९, १०, ११, १२ च्या लवाद सुनावणीस प्रारंभ
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) अंतर्गत नियोजित आणि शाश्वत शहरी विकासाला चालना देण्यासाठी नगररचना परियोजना हा प्रमुख विकास प्रारुप म्हणून स्वीकारण्यात आला आहे. सध्या नैना क्षेत्रात एकूण १२ नगररचना परियोजना प्रस्तावित असून, त्यापैकी परियोजना १ आणि २ या अंतिम मंजुरी प्राप्त झालेल्या आहेत, तर परियोजना ३ ते ७ यांना प्राथमिक मान्यता मिळाली आहे. नगररचना परियोजना ८, ९, १०, ११ आणि १२ यांसाठी लवाद सुनावणीस प्रारंभ झाला असून, संबंधित भूधारकांनी या प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.
नैना क्षेत्रातील नियोजित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सिडको सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रक्रियेस गती देण्यासाठी नगररचना परियोजना ८, ९, १०, ११ आणि १२ अंतर्गत भूखंड अंतिमिकरण व लवाद सुनावणी कार्यवाही सुरू झाली आहे. या सुनावणी प्रक्रियेमध्ये भूधारकांचे म्हणणे विचारात घेऊन त्यांचे हित जोपासण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. या संदर्भात, लवाद सुनावणीमध्ये भूधारकांनी त्यांचे म्हणणे सादर करावे, जेणेकरून विकास प्रक्रियेत पारदर्शकता आणि समावेशकता सुनिश्चित करता येईल. नगररचना परियोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि भूधारकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सिडकोकडून व्यापक जनजागृती मोहीम देखील राबवली जात आहे.
नैनाक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच पायाभूत सुविधा आणि नागरी सुविधांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सुधारणा शुल्क / बेटेरमेन्ट चार्जेस संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक पुढील प्रक्रिया सुरू आहे.
नगररचना परियोजना ८, ९, १०, ११ आणि १२ अंतर्गत भूधारकांसाठी नैना लवाद कार्यालय, बेलापूर रेल्वे स्थानक संकुल, ७ वा मजला, टावर नं १०, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे कार्यरत असून, संबंधित भूधारकांनी या ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे सिडकोतर्फे सूचित करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे, ज्या भूधारकांना त्यांच्या वाटप झालेल्या भूखंडांबाबत आक्षेप आहेत त्यांनी लवाद सुनावणी दरम्यान आपली भूमिका मांडावी. सिडकोने यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पारदर्शक ठेवली असून, भूधारकांच्या आक्षेपांचे निराकरण योग्य रीतीने केले जाणार आहे. तसेच, मसुदा आराखड्यात वाटप करण्यात आलेल्या अंतिम भूखंडांच्या मालकीबाबत संबंधित भूधारकांना स्पष्टता मिळावी, यासाठी लवाद सुनावणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे संबंधित सर्व भूधारकांनी आपली कागदपत्रे तपासून, आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून लवाद प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा.
सिडकोने शाश्वत आणि नियोजनबद्ध शहरी विकासाला चालना देण्यासाठी कटिबद्ध राहून महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. नैना क्षेत्राचा नियोजित आणि सुव्यवस्थित विकास हा महाराष्ट्राच्या प्रगत आणि समृद्ध नागरीकरणासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. या पार्श्वभूमीवर, भूधारकांनी नगररचना परियोजना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि विकास प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन सिडको प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.