शहरामध्ये विजेचा लपंडाव; नागरिक हैराण

अंबरनाथ : शहरात जुन्या आणि तकलादू विद्युत यंत्रणा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रकरणी ‘शिवसेना'चे माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी ‘महावितरण'कडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

अंबरनाथमध्ये जुने ट्रान्सफॉर्मर, लोंबकळणाऱ्या तारा आणि धोकादायक विद्युत खांब यामुळे वीज पुरवठा सतत खंडीत होत आहे. पावसाळ्यात वादळी वाऱ्याशिवायही वीजपुरवठा अचानक खंडीत होण्याच्या घटना वाढल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून विद्युत खांब आणि तारांवर झाडे पडून लाईन तुटणे, तसेच पडघा सब-स्टेशनकडून होणारे भारनियमन यामुळे वीज जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांवर परिणाम...
या सततच्या वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे अनेक घटकांना मोठा फटका बसत आहे. वयोवृध्द, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ‘वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या नागरिकांचे काम थांबत आहे, तर ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. व्यापारी, लघुउद्योजक आणि दुकानदारांना त्यांच्या व्यवसायात अडथळे येत आहेत. एकूणच, सामान्य नागरिकांचे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले आहेत.

दरम्यान, ‘शिवसेना'चे माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी कल्याण येथील ‘महावितरण'चे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी अंबरनाथ मधील वीज समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतंत्र आणि स्थिर वीज पुरवठा यंत्रणा निर्माण करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी वाहतुकीस अडथळा ठरणारे अपघातग्रस्त विद्युत खांब तातडीने स्थलांतरीत करण्याची, विद्युत वाहिन्यांवर झाडे पडणे, लाईन तुटणे, डीओ तुटणे यासारख्या समस्यांवर गांभिर्याने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा चिखलातून प्रवास