कटई-कर्जत पाईपलाईन रोडवर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर

अंबरनाथ : अंबरनाथ एमआयडीसी मधील आनंदनगर परिसरातून जाणारा कटई-कर्जत पाईपलाईन रस्ता अंबरनाथ शहर आणि औद्योगिक वसाहतीस जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दळणवळण मार्ग आहे. मात्र, या रस्त्यावर वाहतूक नियमनाची कोणतीही यंत्रणा नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

दररोज सकाळी आणि सायंकाळी शिपट बदल्याच्या वेळेस तसेच सुट्टीच्या दिवशी या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. परंतु, येथे सिग्नल यंत्रणा, ट्रॅफिक नियंत्रण व्यवस्था किंवा नियमित पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे सतत वाहतूक कोंडी निर्माण होते. याचा परिणाम शालेय आणि व्यावसायिक वाहने, रुग्णवाहिका आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही होत असून, नागरिकांचे दैनंदिन आयुष्य विस्कळीत होत आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांकडून एमआयडीसी प्रशासनाकडे सदर रस्त्यावर त्वरित वाहतूक सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेषतः टी-सर्कल, कृष्णा पॅलेस हॉटेल समोरील चौक, जेसपी पेट्रोल पंप (वैभव हॉटेल) समोरील चौक, नेवाळी फाटा, तळोजा फाटा सर्कल आणि कोळेगांव चौक येथे सिग्नल यंत्रणा तसेच आवश्यकता भासल्यास सिग्नल नियंत्रक आणि सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी अंबरनाथचे माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी ‘एमआयडीसी'चे अधीक्षक अभियंता भूषण हरसे आणि कार्यकारी अभियंता शंकर आव्हाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वाहतूक नियमनासाठी यंत्रणात्मक उपाययोजना केल्यास संभाव्य अडथळे, अपघात आणि दिरंगाई टाळता येईल. त्यातून नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा सुभाष साळुंके यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, संबंधितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन साळुंके यांना दिले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया