मान्सूनपूर्व तयारीला वेग!
ठाणे : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील विविध प्राधिकरणांमार्फत सुरु असलेली विकासकामे येत्या २० मे पर्यंत पूर्ण करण्याचे तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क राहावे, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी तथा ‘जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण'चे अध्यक्ष अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ‘जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माने यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे मान्सूनपूर्व उपाययोजनांच्या तयारीची माहिती दिली.
घोडबंदर रोडवरील कामांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आणि सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित प्राधिकरणांशी समन्वय साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शिनगरो यांनी केले आहे. पावसाळ्यात कोणतीही आपत्ती आल्यास एकमेकांकडे अंगुलीनिर्देश न करता सतर्क राहून काम करण्याचेही त्यांनी बजावले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी शिनगारे यांनी सर्व यंत्रणांना ‘अलर्ट मोड'वर राहण्याचे आणि भरतीच्या वेळी विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. जास्त उंचीच्या लाटा येण्याची शक्यता असलेल्या दिवशी आवश्यक उपाययोजनांसह सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच सर्व विभागांचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४े७ कार्यरत ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
‘एमएमआरडीए'ला मान्सूनपूर्वी सर्व रस्त्यांची आवश्यक देखभाल-दुरुस्ती करण्याचे, रस्त्यांवरील खड्डे टाळण्याचे आणि पूर्ण झालेल्या कामांवरील बॅरिकेडस् हटवण्याचे तसेच ‘एमएसआरडीसी'ने खारीगांव टोलनाक्यावरील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
पावसाळ्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने योग्य नियोजन केले असून आणि समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील धोकादायक झाडे आणि फांद्या छाटणीचे काम ३० मे पर्यंत पूर्ण करून हरित कचऱ्याची त्वरित विल्हेवाट लावावी आणि सर्व यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शिनगारे यांनी दिले.