सीबीडी सेक्टर-१५ मधील रस्ते डांबरीकरण कामात नागरिकांच्या पैशांची उधळण
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक-१०७ सीबीडी सेक्टर-१५ मधील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे काम सुरु असून, सदर ठिकाणचे पूर्वीच रस्ते सुस्थितीत आणि देखभाल-दुरुस्तीच्या कामामध्ये समाविष्ठ असताना तसेच संबंधित रस्त्यांबाबत कोणाचीही तक्रार नसताना नागरिकांच्या कररुपी पैशांची उधळण महापालिका स्थापत्य विभाग मार्फत सुरु आहे. अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरण करण्याच्या या कामामुळे महापालिकेचे दोन वेळा आर्थिक नुकसान करण्यात आले आहे, असे निदर्शनास आणून, ‘सीबीडी सेक्टर-१५ मधील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याच्या कामातील त्रुटी आणि कामातील दर्जा याविषयी चौकशी करण्यात यावी', अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा ‘भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा'चे कोकण विभाग उपाध्यक्ष सुधीर गोरखनाथ पाटील यांनी नवी मुंबई महापालिका आयुवत डॉ. कैलास शिंदे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
देखभाल-दुरुस्तीमध्ये समाविष्ठ असलेल्या सीबीडी सेक्टर-१५ मधील अंतर्गत रस्त्यांचे महापालिका ठेकेदाराला देयके अदा करत असताना त्याच रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचेही काम काढून दुसऱ्या ठेकेदाराला लाभ मिळवून देण्याचे डांबरट काम संबंधित अभियंत्यांनी केले आहे. सदरच्या रस्त्यांच्या डांबरीकरण करण्याचे काम काढण्याआधी त्या ठिकाणचे रस्ते खड्डेयुक्त अथवा सुस्थितीत नाहीत, याची खात्री करणारा अहवाल कशाच्या आधारे आणि कोणी तयार केला आहे?, त्यासाठी कोणते पुरावे (गूगल फोटो) कामाच्या मंजूरीसाठी नस्तीमध्ये लावण्यात आले होते?, साधारणतः या रस्त्यांचे एकूण अंतर किती आहे ? आणि प्रती किलोमिटरसाठी लावण्यात आलेले (डीएसआर प्रमाणे) दर काय आहेत?, कोणत्या ठिकाणी आणि किती प्रमाणात रस्त्यांमध्ये खड्डे पडले होते?, असे प्रश्नही सुधीर पाटील यांनी उपस्थित केले असून, या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी मागितली आहेत.
‘सीबीडी सेक्टर-१५ मधील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे काम सुरु असताना कामाच्या निरिक्षणासाठी बेलापूर स्थापत्य विभागातील एकही अभियंता जागेवर उपलब्ध नव्हता.त्यामुळे कामातील प्रत्यक्ष निविदा आणि अंदाजपत्रक मधील तांत्रिक अटी-शर्तीनुसार रस्त्याच्या डांबरीकरण करण्याच्या कामामध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे विविध थर तसेच एसी आणि डांबर लिक्वीडची फवारणी व्यवस्थितरित्या पसरविण्यात आलेली नाही. या कामातील सर्वसाधारण नियम आणि अटी शर्तीनुसार चार ते पाच इंचाचा डांबरीकरणाचा थर रस्यावर टाकणे गरजेचे असताना जास्तीत जास्त दोन ते तिन इंचाचाच थर पसरवण्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला तर त्याहीपेक्षा कमी थर टाकण्यात आला आहे. त्यामुळे सदर डांबरीकरणाचे काम अधिक काळ टिकाऊ आणि मजबूत राहणार नाही. सदर काम सुरु असताना कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजना करणे आणि दक्षता घेणे तसेच त्या अटी शर्तीनुसार करवून घेणे संबंधित ठेकेदाराचे आणि स्थापत्य विभागाच्या संबंधित अभियंत्यांचे काम असताना कामगारांच्या सुरक्षिततेचे नियम पाळण्यात आले नाहीत, असे निवेदनात अधोरेखित करुन, ‘सीबीडी सेक्टर-१५ मधील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण कामातील दोष निवारण केल्याशिवाय आणि सदर ठिकाणी काढण्यात आलेले काम देखभाल-दुरुस्ती मध्ये येत नसल्याचे लेखी पत्र (पुराव्यासह) नस्तीमध्ये जोडल्याशिवाय तसेच स्थापत्य विभागातील अभियंत्यांची लेखी जबाबदारी आणि खात्री घेतल्याशिवाय संबंधीत ठेकेदाराला कामाची देयके अदा करण्यात येऊ नयेत', अशी मागणीही सुधीर पाटील यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
एकूणच ‘सीबीडी सेक्टर-१५ मधील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे काम संशयीत असल्याने या कामात वापरण्यात आलेल्या डांबराचे Test Report मान्यता प्राप्त संस्थाकडून घेणे आवश्यक असून, या कामातील त्रुटी आणि कामातील दर्जा याविषयी चौकशी करण्याची देखील आवश्यकता असल्याने आपण नागरिकांच्या कररुपी पैशांची उधळण करणाऱ्या रस्ता डांबरीकरण कामाची चौकशी करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.- सुधीर गोरखनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते - नवी मुंबई.