नेरुळ रेल्वे स्टेशन परिसरात सिडको सुरक्षा विभागाची मोठी कारवाई
नवी मुंबई : सिडकोच्या सुरक्षा विभागाने नेरुळ रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले, गाळाधारक, गर्दुल्ले आणि अनधिकृत वाहनांवर कारवाई करून त्यांना हटवण्यात आले. या विशेष मोहिमेमुळे स्टेशन परिसर स्वच्छ आणि प्रवाशांसाठी मोकळा करण्यात आला. 2 जुलै रोजी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली.
सिडकोकडून नवी मुंबईतील रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृत अतिक्रमण, फेरीवाले, गर्दुले यांच्यावर नियमित कारवाई केली जाते. गत बुधवारी देखील सिडको सुरक्षा अधिकारी आणि रक्षकांच्या मदतीने पादचारी पूल, रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूंना असलेले अनधिकृत फेरीवाले, गाळाधारक आणि गर्दुळे यांना हटवण्यात आले. यावेळी स्टेशनच्या आजूबाजूला पार्क करण्यात आलेली अनधिकृत वाहने देखील हटवण्यात आली. या कारवाईमुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त करत स्टेशन परिसर स्वच्छ व सुरळीत राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
सिडकोकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, रेल्वे स्थानकांवर किंवा परिसरात फेरीवाले, गर्दुले किंवा अनधिकृतपणे माल साठवणारे गाळाधारक दिसल्यास नागरिकांनी www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.