नेरुळ येथील वासंतिक कवि संमेलनास चांगला प्रतिसाद
नवी मुंबई : ‘नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ नवी मुंबई' या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक भवन येथे २८ मार्च रोजी वासंतिक कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी नवी मुंबईचे कवी जितेंद्र लाड होते. या कविसंमेलनात ३५ कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
नवरंगचे अध्यक्ष गज आनन म्हात्रे यांनी आपल्या प्रास्ताविकात समाजात कवींची संख्या वाढणे हे चिंतेचे नव्हे तर साहित्यिक दृष्टीने चांगले लक्षण असल्याचे प्रतिपादन केले. सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रिझर्व्ह बँकेचे निवृत्त प्रबंधक विकास साठे हे उपस्थित होते. मराठी भाषा अभिजात घोषित केल्यावर मराठीसाठी अभिनव उपक्रम करण्याची स्फूर्ती यावी असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जितेंद्र लाड यांनी आपल्या सुरस कविता गाऊन कविसंमेलनात रंग भरले. नवरंगच्या सभासद सौ.कल्पना मुनघाटे यांनी कार्यक्रमाचे यथोचित सूत्रसंचालन केले. कार्यवाह घनश्याम परकाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास नवीमुंबई, ठाणे,मुंबई, पनवेल परिसरातील काव्यप्रेमी सहभागी झाले होते. या कार्यक्रमास नेरुळ ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालयाचे सहकार्य लाभले.