ताडगोळा फळ विक्रीतून स्थानिकांना रोजगार उपलब्धी
उरण : ताडगोळा फळाचे सेवन शरीरासाठी लाभदायक ठरत असल्याने सध्या ताडगोळा फळे खरेदी करण्यासाठी उरण बाजारात नागरिकांची गर्दी होत आहे. ताडगोळा फळ चवीला गोड असून, या फळामध्ये व्हीटॅमीन सी, खनिज आणि लोह असल्यामुळे ताडगोळा सेवनाने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ताडगोळा फळ शरीराला ऊर्जा देणारे, थंडावा देणारे आणि नैसर्गिक फळ असल्याने आरोग्यदायी फायद्यांसाठी ग्राहकांचा कल अधिक प्रमाणात ताडगोळा फळ खरेदी करण्याकडे वाढत असल्याचे चित्र उरण बाजारपेठेत दिसत आहे. दुसरीकडे ताडगोळे फळ विक्रीमुळे स्थानिक ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
उरण तालुक्यातील नागाव, केगाव, मुळेखंड आदी गावांतून ताडगोळे उरण बाजारात विकावयास येत आहेत. ताडगोळे शक्यतो पहाटेच झाडावरुन काढून सकाळीच बाजारात विकावयास आणले जातात. उरण बाजारपेठेतील राजपाल नाका जवळील एच. बी. पटेल जनरल स्टोअर्स जवळ, गांधी चौक, सीटी झोन हायस्कूल चौक, आनंद नगर आदि ठिकाणी ताडगोळे विक्रीसाठी येत आहेत .
उरण बाजारात ताडगोळे विक्रीसाठी येऊ लागले आहेत. ग्राहकांना प्रति डझन १५० रुपये दराने ताडगोळे विक्री केली जात आहे. गेल्यावर्षी साधारणपणे प्रति डझन १०० रुपये किंवा त्यापेक्षा कमी दरात मिळणाऱ्या ताडगोळा दरात यंदा वाढ झाल्याने नागरिकांनी ताडगोळे खरेदी करताना हात आखडता घेतला आहे. मात्र, आवक वाढल्यानंतर ताडगोळे दरात घट होईल, अशी माहिती ताडगोळे विक्रेत्यांनी दिली आहे. उरण मधील समुद्र किनाऱ्यावर ताडांची झाडे आहेत. या झाडांच्या माध्यमातून ताडी आणि ताडगोळे यांची विक्री केली जाते. मात्र, सध्या उरण परिसरातील ताडांच्या झाडांची संख्या घटली आहे. सध्या उंच झाडांवर चढून ताडगोळे काढण्यासाठी कामगार उपलब्ध होत नाहीत. ताडगोळे काढण्यासाठी कामगार उपलब्ध झाले तर त्यांचे दर परवडत नाहीत, असे ताडगोळे विक्रेत्यांनी सांगितले. उन्हाळ्यात बाहेरील वातावरणाने शरीराचे वाढणारे तापमान कमी करण्यासाठी ताडगोळे फळ महत्वाचे काम करत असल्यामुळे या फळाला ग्राहकांची अधिक पसंत मिळत आहे.